झुडपी जमिनीवर वनविभाग साकारणार उद्यान
By admin | Published: August 23, 2016 02:05 AM2016-08-23T02:05:37+5:302016-08-23T02:05:37+5:30
येथील वनविभाग कार्यालयाच्या सभोवताल असलेल्या शासकीय झुडपी आणि पडिक जमिनीवर
कारंजा (घाडगे) : येथील वनविभाग कार्यालयाच्या सभोवताल असलेल्या शासकीय झुडपी आणि पडिक जमिनीवर ज्येष्ठ नागरिक आणि बालकांसाठी उद्यान तयार करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती वनक्षेत्र अधिकारी व्ही.व्ही. तळणीकर यांनी दिली. या कामाचा शुभारंभ म्हणून या जागेला तारांची संरक्षक भिंत तयार करून १ हजार ५०० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
कारंजा वनकार्यालयाचे सभोवताल शासकीय वनविभागाची सर्व्हे नं. १९४ मध्ये ५.३३ हेक्टर पडीक व झुडपी जमीन आहे. आतापर्यंत या शासकीय जागेवर काहींनी अतिक्रमण करून जागेचा गैरवापर होता. वनपरिक्षेत्र अधिकारी तळणीकर यांनी जिल्हा वनधिकारी पगार यांच्या मार्गदर्शनाखाली ही पडीक जमीन ताब्यात घेवून सौदर्यीकरण करून ज्येष्ठ नागरिक व बालकासाठी सुशोभित उद्यान निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
सर्व जमिनीच्या सभोवताल ताराचे कपाऊंड घालून जमीन ताब्यात घेण्यात आली. जवळपास ७५ वन कर्मचाऱ्यांनी स्वत: मेहनत घेवून खोलगट चर तयार केलेत. या चरावर करंज आणि ब्लोसेडीया या जातीचे १ हजार ५०० झाडे लावली. चराच्या बाजूला असलेल्या खोलगट भागात टेकडीवरील पाणी उतरून साचणार आणि लावलेल्या झाडांना निसर्गत: पाणी मिळणार अशी व्यवस्था या कर्मचाऱ्यांनी केली. याच परिसरात इतर शोभेची झाडे, मुलांसाठी खेळाचे साहित्य, आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था करून उद्यान निर्माण केले जाणार आहे. कारंजा शहरात इतरत्र कुठेही उद्यान नसल्यामुळे निश्चितच या उद्यानाला आगळे वेगळे महत्त्व येणार अशी चर्चा शहरात आहे. (तालुका प्रतिनिधी)