जिल्ह्यातील अकरा रुग्णालयांमध्ये उभारल्या जाणार गॅस ऑक्सिजन प्लान्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 05:00 AM2021-05-01T05:00:00+5:302021-05-01T05:00:02+5:30

कोविडच्या दुसऱ्या लाटेत सोसाव्या लागत असलेल्या ऑक्सिजन तुटवड्याच्या झळांवर मात करण्यासह तिसऱ्या लाटेत कुठल्याही परिस्थितीत ऑक्सिजन तुटवडा निर्माण होऊ नये, या हेतुने  जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा, उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट व आर्वी, महिला रुग्णालय वर्धा तसेच जिल्ह्यातील आठही ग्रामीण रुग्णालयांत गॅस ऑक्सिजन प्लान्ट उभारण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

Gas oxygen plants will be set up in eleven hospitals in the district | जिल्ह्यातील अकरा रुग्णालयांमध्ये उभारल्या जाणार गॅस ऑक्सिजन प्लान्ट

जिल्ह्यातील अकरा रुग्णालयांमध्ये उभारल्या जाणार गॅस ऑक्सिजन प्लान्ट

Next
ठळक मुद्देतज्ज्ञ एजन्सी अन् यंत्रसामग्री मिळत नसल्याने प्रत्यक्ष कामाला लागलेय ‘ब्रेक’

महेश सायखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क 
वर्धा : जिल्हा सामान्य रुग्णालयासह एकूण ११ शासकीय रुग्णालयांत गॅस ऑक्सिजन प्लान्ट बसविण्याचे जिल्हा प्रशासनाने निश्चित केले आहे. सध्याच्या कोविड संकटात हे काम वेळीच पूर्णत्वास गेल्यास भविष्यातील प्राणवायू तुटवड्यावर मात करता येईल. पण हे प्रकल्प उभारण्यासाठी एजन्सी तसेच यंत्रसामग्री सध्या उपलब्ध न झाल्याने ती वेळीच कशी उपलब्ध होईल, यासाठी जिल्हा प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांसह  आरोग्य विभाग प्रयत्न करीत आहे.
कोविडच्या दुसऱ्या लाटेत ठिकठिकाणी वैद्यकीय प्राणवायूचा तुटवड्या जाणवत आहे. इतकेच नव्हे तर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेत सोसाव्या लागत असलेल्या ऑक्सिजन तुटवड्याच्या झळांवर मात करण्यासह तिसऱ्या लाटेत कुठल्याही परिस्थितीत ऑक्सिजन तुटवडा निर्माण होऊ नये, या हेतुने  जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा, उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट व आर्वी, महिला रुग्णालय वर्धा तसेच जिल्ह्यातील आठही ग्रामीण रुग्णालयांत गॅस ऑक्सिजन प्लान्ट उभारण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जात असला तरी सध्या प्रकल्प उभारणारी एजन्सी तसेच यंत्रसामग्री वेळीच उपलब्ध होत नसल्याने अधिकाऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. पण, या अडचणीवर वेळीच मात केली जाईल, असा विश्वास प्रत्यक्ष काम करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. कोविडची तिसरी लाट वर्धा जिल्ह्यावर ओढावण्यापूर्वी हे काम युद्धपातळीवर पूर्ण होण्याची गरज आहे. शनिवारी पालकमंत्री सुनील केदार वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून या संबंधीही आढावा ते घेण्याची शक्यता आहे.

ऑक्सिजन सिलिंडरवरील खर्च वाचणार
जसध्या जम्बो ऑक्सिजन सिलिंडर भरून घेण्यासाठी किमान ५०० ते ७०० रुपये खर्च येत आहे. गॅस ऑक्सिजन प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर हा मोठा खर्च वाचणार आहे. गॅस ऑक्सिजन प्रकल्पात काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णांना ऑक्सिजन देण्यासाठी केवळ काही ऑक्सिजन सिलिंडर या रुग्णालयांत ठेवावी लागणार आहेत.

एका युनिटसाठी येणार किमान ५५ लाखांचा खर्च

जिल्ह्यातील एकूण ११ शासकीय रुग्णालयात गॅस ऑक्सिजन प्लान्ट उभारण्याचे जिल्हा प्रशासनाने निश्चित केले आहे. एका गॅस ऑक्सिजन प्लान्टसाठी किमान ५५ लाखांचा निधी खर्च अपेक्षित असून, त्यासाठी मोठा निधीही उपलब्ध करून देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
साधारणत: लागतो दोन ते तीन लिटर ऑक्सिजन
नॉर्मल व्यक्तीला एका मिनिटाला दोन ते तीन लिटर ऑक्सिजन लागतो. पण, शरीरातील ऑक्सिजन पातळी कमी झालेल्या व्यक्तीची ऑक्सिजनची मागणी वेगवेगळी असते. कोरोनाग्रस्त गंभीर रुग्णाची ऑक्सिजनची मागणी जास्त राहत असून, हे प्रकल्प वेळीच पूर्णत्वास गेल्यास भविष्यातील ऑक्सिजनची समस्या निकाली निघणार आहे. शिवाय या प्लॅन्टमुळे आरोग्य यंत्रणा ऑक्सिजनबाबत सक्षम होणार आहे.

उत्पादित होणार ५०० लिटर प्राणवायू
उभारण्यात येणाऱ्या गॅस ऑक्सिजन प्लान्टची क्षमता ५०० लिटर प्राणवायू उत्पादनाची राहणार आहे. इतकेच नव्हे तर प्राणवायू वाहिनीचा वापर करून उत्पादित होणारे ऑक्सिजन रुग्णांना देण्यात येणार आहे.

बसविली जाणार प्राणवायू वाहिनी 
जिल्हा रुग्णालय, हिंगणघाट व आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राणवायू वाहिनी बसविण्यात आली आहे. सध्या जम्बो आणि छोट्या गॅस सिलिंडरमधील लिक्विड ऑक्सिजन याच प्राणवायू वाहिनीच्या साहाय्याने रुग्णांना ऑक्सिजन दिला जात आहे. मात्र, महिला रुग्णालयासह जिल्ह्यातील आठ ग्रामीण रुग्णालयांत गॅस ऑक्सिजन प्लान्ट कार्यान्वित करताना प्राणवायू वाहिनी टाकावी लागेल.  त्यासाठी जिल्हा प्रशासन सकारात्मक आहे.

एकावेळी किमान १३० रुग्णांना देता येणार प्राणवायू
५०० लिटर क्षमतेच्या गॅस ऑक्सिजन प्रकल्पाच्या माध्यमातून एकाच वेळी किमान १३० रुग्णांना ऑक्सिजन देता येणार आहे. एखाद्या वेळी या प्रकल्पात तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास भरलेल्या लिक्विड ऑक्सिजन सिलिंडरमधील प्राणवायू रुग्णांना दिला जाणार आहे.

 

Web Title: Gas oxygen plants will be set up in eleven hospitals in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.