गरिबाची ‘उज्ज्वला’ दुर्लक्षी धोरणामुळे गॅसवरून चुलीवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 05:00 AM2021-02-25T05:00:00+5:302021-02-25T05:00:37+5:30
केंद्र शासनाने पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना सुरू केली. जिल्ह्यातील २, ८०,६९२ सिलिंडरधारकांपैकी ४१, ६१० उज्ज्वला योजनेचे लाभार्थी असून या सर्वांना जिल्ह्यातील २७ गॅस एजन्सीच्या माध्यमातून सिंलिडरचा पुरवठा होतो. शासनाने उज्ज्वला योजनेंतर्गत लाभार्थ्यांना सिलिंडर व शेगडी मोफत दिली. मात्र, आता सिलिंडर भरुन घेण्यासाठी ८२१ रुपये मोजावे लागत आहे. सिलिंडर सध्या ८२१ रुपयांचे असून उज्ज्वलाच्या लाभार्थ्यांना ८० तर इतर ग्राहकांना ४० रुपये अनुदान मिळते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वाढती वृक्षतोड थांबविण्यासाठी आणि महिलांचे आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना सुरु केली. या योजनेंतर्गत गावागावात मोठ्या प्रमाणात मोफत गॅस जोडणीचे वितरण करण्यात आले. परंतु, गॅस सिलिंडरचे दर झपाट्याने वाढायला लागले. शासनाकडून मिळणारे अनुदान कमी आणि सिलिंडरचे दर आठशे पार गेल्याने ग्रामीण भागात ‘उज्ज्वला’ योजना गुंडाळली असून गृहिणींनी पुन्हा चूल पेटवायला सुरुवात केली आहे.
ग्रामीण भागात चुलीवरच स्वयंपाक केला जातो. यातून निघणाऱ्या धुरामुळे महिलांना विविध आजार होतात. तसेच इंधनाकरिता मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करावी लागते. याच बाबी लक्षात घेऊन केंद्र शासनाने पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना सुरू केली. जिल्ह्यातील २, ८०,६९२ सिलिंडरधारकांपैकी ४१, ६१० उज्ज्वला योजनेचे लाभार्थी असून या सर्वांना जिल्ह्यातील २७ गॅस एजन्सीच्या माध्यमातून सिंलिडरचा पुरवठा होतो. शासनाने उज्ज्वला योजनेंतर्गत लाभार्थ्यांना सिलिंडर व शेगडी मोफत दिली. मात्र, आता सिलिंडर भरुन घेण्यासाठी ८२१ रुपये मोजावे लागत आहे. सिलिंडर सध्या ८२१ रुपयांचे असून उज्ज्वलाच्या लाभार्थ्यांना ८० तर इतर ग्राहकांना ४० रुपये अनुदान मिळते. यामुळे आता सर्वसामान्यांनाही सिलिंडर घेणे परवडणारे नाहीत. पण करणार काय हा त्यांच्यासमोरील प्रश्न आहे. ग्रामीण भागात चुलीचा पर्याय असल्याने उज्ज्वला योजनेतील शेगडी व सिलिंडर गुंडाळून आता पुन्हा चुलीवर रांधायला सुरुवात झाली आहे.
कमाई कमी, गॅसचा खर्च वाढताच
प्राधान्य कुटुंबाच्या लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न ४४ हजार तर शहरी लाभार्थ्यांचे उत्पन्न ५९ हजार रुपये ग्राह्य धरले जातात. यावरुन त्यांच्या मासिक उत्पन्नाचा अंदाज घेतला तर ते ५,००० रुपयांच्या आतच येते.
कमी उत्पन्नात दरमहा ८०० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम गॅस सिलिंडरवर खर्च करणे त्यांना परवडणारे नाहीत. त्यामुळे चुलीचाच पर्याय निवडला जात आहे.
गृहिणी काय म्हणतात...
चुलीपेक्षा गॅसवर लवकर स्वयंपाक होतो. त्यामुळे गॅस सिलिंडर घेतले. काही दिवस गॅसचा वापरही केला. परंतु आता सिलिंडरचे दर गगणाला भिडल्याने नियमित गॅसचा वापर करणे परवडणारे नाहीत. म्हणून पुन्हा चुलीवरच स्वयंपाक करावा लागत आहे
- वृषाली अजय बोबडे, आर्वी.
उज्ज्वला गॅस योजनेतून गॅस-सिलिंडर मिळाल्यापासून चुलीचा वापर कमीच झाला. आता इंधन, रॉकेलही मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे दीडशे-दोनशे रुपयाने रोजमजुरी करुन सिलिंडर विकत घ्यावे लागत आहे. सिलिंडरचे दर वाढत आहे. अशातही तडजोड करीत आहे.
- ज्योती कंगाले, रिधोरा.
शेतातील पºहाटी, तुरीचे फणकट आणि लाकडही सहज उपलब्ध होते. त्यामुळे चुलीचा वापर जास्त असतो. परंतु कधी ओले इंधन पेटायला वेळ लागतो, कधी कामाची धावपळ असते, अशा वेळी गॅसचा वापर करतो. आता घरोघरी गॅस उपलब्ध झाल्याने आम्हीही गॅस कनेक्शन घेतलेले आहे. गेल्या काही दिवसांपासून सिलिंडरचे दर वाढायला लागल्याने गॅसचा वापर आणखी कमी केला आहे.
- प्रणोती झाडे, सोनेगाव (बाई)
सर्वत्रच आता गॅसचा वापर वाढला आहे. शासनाच्या योजनेमुळे गरिबांच्याही घरात आता गॅस सिलिंडर पोहोचले आहे. तसेच ग्रामीण भागात बहुतांश घरामध्ये चुलीवरच स्वयंपाक केला जातो. महागड्या गॅसचा वापर मोजक्याच कामासाठी केला जातो.
- सुलभा राखुंडे, वर्धा.
आम्ही दोघेही मोलमजुरी करुन घर चालवितो. आता शासनाची योजना असल्याने आम्हीही गॅस कनेक्शन घेतले. गॅस घेतल्यापासून चुलीचा वापर कमी झाला. परंतु सिलिंडरचे दर सतत वाढत असल्याने सिलिंडर भरण्यासाठी मोठी अडचण जात आहे.
-प्रतिभा बेंडे, झडशी.