वाघांच्या संरक्षणाकरिता गस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 10:40 PM2017-11-17T22:40:26+5:302017-11-17T22:41:18+5:30
गत काही दिवसांपासून शेताला विजेचे कुंपण लावून वाघाची शिकार करण्याच्या घटना घडत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गत काही दिवसांपासून शेताला विजेचे कुंपण लावून वाघाची शिकार करण्याच्या घटना घडत आहेत. यावर आळा घालण्याकरिता आणि वाघांच्या संरक्षणाकरिता महावितरणने पुढाकार घेतला आहे. महावितरण वन विभागाच्या सहकार्याने रात्रीच्या वेळी ग्रामीण भागात गस्त घालून अशा प्रकारांना आळा घालणार आहे. वर्धा आणि चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात गत दोन महिन्याच्या कालावधीत ३ वाघांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला.
शेतातील कुंपणात वीज प्रवाह सोडल्याने या वाघांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले होते. शेतातील कुंपणात वीज प्रवाह सोडल्याने केवळ प्राण्यांचीच नाही तर मनुष्यांचेही जीव गेले आहे. हा प्रकार बेकायदेशीर असतानाही सुरूच आहे. वाघाशिवाय अन्य जंगलीजनावरांच्या शिकारीसाठी कधी कधी शेतातील कुंपणातवीज प्रवाह सोडल्या जातो. जंगली जनावरांची शिकार केल्यावर याचा फारसा गवगवा होत नाही.
जनतेमध्ये जागृती करण्यासाठी महावितरणकडून वाघाची शिकार करणे हा दंडनीय अपराध आहे या साठी कायद्यात शिक्षेची तरतूदही केली आहे. असा संदेश लिहलेले पोस्टर्स ग्रामीण भागात लावण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. सोबतच रात्रीच्या वेळी कोणी शेतातील कुंपणात वीजप्रवाह सोडला आहे याची तपासणी महावितरण आणि वनविभागाचे पथक ग्रामीण भागात करीत आहे.
नागपूर जिल्ह्यातील बडेगाव, वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुका गुरुवारी गस्त घालण्यात आली. वरोरा येथील खेमजीगावात महावितरण आणि वन विभागाच्या गस्ती पथकास एका शेतातीळ कुंपणात वीज तर जोडलेली आढळून आली; पण ती प्रवाहित नसल्याचे निदर्शनास आले. यापुढे असे प्रकार आढळून आले तर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे महावितरणकडून कळविण्यात आले आहे.
पिकांच्या संरक्षणाचे शेतकऱ्यासमोर नवे संकट
जंगलव्याप्त भागात रात्रीच्या सुमारास वन्य प्राण्यांच्या हैदोसाने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होते. हे नुकसान टाळण्याकरिता शेतकऱ्यांकडून हा प्रकार करणे सुरू झाले. या प्रकारामुळे जंगली श्वापदांच्या त्रासापासून शेतकऱ्यांची सुटका झाली. मात्र गत महिन्यात वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील सिंदी विहिरी येथे शेताच्या कुंपनाला असलेल्या विज प्रवाहातून ही घटना घडली. आता असा प्रकार करणाºया शेतकºयांवर दंडात्म कार्यवाही करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे.