सामान्य रुग्णालयात रुग्णांना बाहेरूनच विकत घ्यावी लागते औषधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 11:54 PM2018-02-06T23:54:50+5:302018-02-06T23:55:14+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालयासह राज्याच्या विविध भागातील शासकीय रुग्णालयात रुग्णांना गत सहा महिन्यांपासून औषधीची खरेदी बाहेरूनच करावी लागत आहे. राज्य सरकारच्या स्तरावरून जिल्हा सामान्य रुग्णालयांना होणारा औषधीचा पुरवठा हा काही ठराविक स्वरूपाचाच करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्हा सामान्य रुग्णालयासह राज्याच्या विविध भागातील शासकीय रुग्णालयात रुग्णांना गत सहा महिन्यांपासून औषधीची खरेदी बाहेरूनच करावी लागत आहे. राज्य सरकारच्या स्तरावरून जिल्हा सामान्य रुग्णालयांना होणारा औषधीचा पुरवठा हा काही ठराविक स्वरूपाचाच करण्यात येत आहे. त्यामुळे विविध आजाराच्या रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात औषधीच वितरीत केली जात नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागातून मोठ्या प्रमाणावर रुग्ण येतात. बाह्य रुग्ण विभागात या रुग्णांची सकाळी वैद्यकीय अधिकारी तपासणी करतात. त्यांना संबंधीत आजाराचे औषध लिहून दिले जातात. बऱ्याच वेळा वातावरण बदलामुळे सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर रुग्णालयात दाखल होतात. मात्र त्या रुग्णांना देण्यासाठी लागणारी औषध रुग्णालयाच्या भांडारात उपलब्ध नाही. राज्यात आरोग्य विभागात औषध खरेदी घोटाळा झाल्यानंतर औषध खरेदीचे सर्व कामे ‘हापकीन्स’ या संस्थेच्या माध्यमातून करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. मात्र या संस्थेने सामान्य रुग्णालयाच्या गरजा लक्षात घेऊन औषध पाठविलेले नाही.
स्थानिक स्तरावर जिल्हा शल्य चिकित्सकांना औषध खरेदीच्या अधिकारांना कात्री लावण्यात आली आहे. त्यामुळे बाह्य रुग्ण विभागात बसून रुग्णांना औषधी लिहून देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याला रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या रोषाला समोर जावे लागत आहे. रुग्णालयात जी औषधी मिळत नाही ते तुम्ही लिहून कशी देता अशी विचारणा रुग्ण करतात. तर काही रुग्ण खासगी डॉक्टरकडे न गेल्याने आपले पैसे वाचले त्या पैशातून ही औषधी बाहेरून खरेदी करीत असल्याचे रुग्णांच्या प्रतिक्रीयेवरून दिसून येत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सर्वच भांडारामध्ये हे चित्र असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.
बालकांच्या औषधीबाबत पालकांच्या तक्रारी
जिल्हा सामान्य रुग्णालयात बाह्य रूग्ण विभागात बालकांना उपचारासाठी आणण्यात येते. येथे बालकांच्या आजाराचे औषधच अत्यल्प स्वरूपात असल्याने बरेच वेळा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लिहून दिलेले औषध हे बाहेरूनच घ्यावे लागतात, असे अनेक पालकांनी सांगितले.
झिरो प्रिस्क्रीप्शनचा बोजवारा
शासनाने मध्यंतरी जिल्ह्यात झिरो प्रिस्क्रिप्शन योजना अंमलात आणली होती. यात रुग्णाला आवश्यक सर्वच औषधी रुग्णालयातून देण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र रुग्णालयात औषधीच उपलब्ध नसल्याने या योजनेचा जिल्ह्यात सध्या बोजवारा निघाल्याचे दिसत आहे.