न.प.ची सर्वसाधारण सभा तहकूब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 09:47 PM2018-12-04T21:47:34+5:302018-12-04T21:47:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : स्थानिक नगर परिषदेची सर्वसाधारण सभा मंगळवारी दुपारी १२ वाजता न.प.च्या अण्णाभाऊ साठे सभागृहात आयोजित ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : स्थानिक नगर परिषदेची सर्वसाधारण सभा मंगळवारी दुपारी १२ वाजता न.प.च्या अण्णाभाऊ साठे सभागृहात आयोजित करण्यात आली होती. परंतु, सदर सभेला अभ्यास दौऱ्यावर गेलेल्या न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे उपस्थित राहू न शकल्याने सर्वानुमते ही सभा तहकूब करण्यात आली आहे. सदर तहकूब सभा बुधवार ५ डिसेंबरला दुपारी १२ वाजता न.प.च्या सभागृहात पार पडणार आहे.
न.प.च्या या सभेत आज सदस्य ठरावसह शिक्षण विभाग, नगररचनाकार विभाग, आरोग्य विभाग, पाणी पुरवठा विभाग, विद्युत विभाग, बांधकाम विभाग, आस्थापना विभागाशी निगडीत विविध विषयांवर चर्चा होणार होती. परंतु, सभा तहकुब झाल्याने त्यावर चर्चा झाली नाही. वर्धा न.प.च्या मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे या प्रादेशिक उपसंचालक, नगरपरिषद प्रशासन, विभागीय आयुक्त नागपूर यांच्या लेखी सुचनेनुसार स्वच्छ सर्वेक्षण २०१९ अंतर्गत छत्तीसगढ राज्यातील अंबिकापूर महानगरपालिका येथे अभ्यास दौºयावर गेल्याने त्या मंगळवारी आयोजित सर्वसाधारण सभेला उपस्थित राहू शकल्या नाही. स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये छत्तीसगढ येथील अंबिकापूर महानगरपालिकेने अव्वल स्थान पटकाविले होते. सध्या स्वच्छ सर्वेक्षण २०१९ अंतर्गत वर्धा शहरातही स्वच्छतेविषयी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. या अभ्यास दौºयाला नागपूर विभागातील सर्व न.प. मुख्याधिकारी सहभागी झाले असून हा अभ्यास दौरा स्वच्छ व सुंदर वर्धा शहरासाठी फायद्याचा ठरणार आहे. मंगळवारची तहकुब झालेली न.प.ची सर्वसाधारण सभा बुधवार ५ डिसेंबरला होणार असून याप्रसंगी विविध विषयांवर न.प. सभागृहात सविस्तर चर्चा होऊन सर्वानुमते विविध विषय मार्गी लागणार आहेत.
बुधवारच्या सर्वसाधारण सभेतील महत्त्वाचे विषय
वर्धा बस स्थानक समोरील सिंधी मार्केट येथे प्रवेशद्वार तयार करून सदर बाजारपेठेला जय झुलेलाल मार्केट असे नाव देणे.
लोक महाविद्यालयाचे मैदान सामाजिक उपक्रमांसाठी देण्यास पुर्नविचार करणे.
नागरिकांच्या सुविधेसाठी आॅनलाईन बांधकाम परवानगी प्रक्रिया सोबतच न.प.ला आॅफलाईन बांधकाम परवानगी प्रस्ताव सादर करण्यास मान्यता प्रदान करणे.
नालवाडी आदिवासी कॉलनी स.न. ५३ क्षेत्र १५.९३ हे. आ. शासकीय जमिनीवरील भुधारकांचे अतिक्रमण नियमानुकूल करण्यासंबंधाने प्रकरण १८.०० मिटर रुंदीचा विकास आराखड्यातील रस्ता हद्द करणेबाबत वैधानिक कार्यवाही पुर्ण करून प्रस्ताव सादर करण्यास मंजुरी मिळणे.
शहरातील बंदिस्त नाट्यगृह बांधण्यासाठी महात्मा गांधी विद्यालयाची जागेचा विकास आराखड्यातील मौजा स्टेशन फैल सर्व्हे क्र. ०८/०१ जागा ३० हजार ५०४.९ मिटर क्षेत्र आरक्षण जागेबद्दल प्रस्ताव महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ अन्वये मान्यतेस्तव व शासनास सादर करणे.
न.प. आस्थापनेवरील कर्मचाºयांना २४ वर्ष आश्वासीत प्रगती योजना लागु करण्यास मान्यता प्र्रदान करणे.
वर्धा नगर परिषदेला प्राप्त ४ कोटी पुरस्काराच्या रक्कमेतून शहरातील मुख्य चौकाचे सौंदर्यीकरण अंतर्गत दुभाजक सौंदर्यीकरण करणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान सौंदर्यीकरणाचे उर्वरित कामे करणे, फेरीवाला क्षेत्र विकास करणे, शहर प्रवेशद्वार विकसीत करणे, शहरामधील बगीचांचा विकास करणे, डागा हॉस्पीटल समोरील मोकळ्या जागेला कुंपन करून सौंदर्यीकरण करणे, इंदिरा गांधी पुतळा परिसराचे दुरूस्तीसह सौंदर्यीकरण करणे, इंदिरा गांधी पुतळा परिसराच्या शेजारी अमर जवान ज्योतची निर्मिती करणे.
शहरातील प्रभाग १२ मध्ये दोन ठिकाणी तर प्रभाग १९ मध्ये चार ठिकाणी अंगणवाडीसाठी जागा निश्चित करणे.
घनकचरा व्यवस्थापन निधी अंतर्गत जुना मुख्याधिकारी बंगला येथील जागेवर घनकचरा व्यवस्थापन वाहन दुरूस्तीसाठी कार्यशाळा व संरक्षण भिंत तयार करण्यासाठी १४ व्या वित्ता आयोग निधी मधून प्रशासकीय व वित्तीय मान्यता प्रदान करणे.
धंतोली चौक ते दादाजी धुनिवाले मठ चौक, महात्मा गांधी पुतळा चौक ते इंदिरा गांधी उड्डाण पूल, डॉ. आंबेडकर पुतळा चौक ते महात्मा गांधी पुतळा चौक, आर्वी नाका चौक ते मराठा हॉटेल चौक, आचार्य विनोबा भावे उड्डाण पूल ते यवतमाळ रोड न.प. हद्दपर्यंत, बजाज चौक ते छत्रपती शिवाजी चौक, डॉ. आंबेडकर पुतळा चौक ते बापूराव देशमुख पुतळा चौक, सुशील हिम्मतसिंगका विद्यालय ते सेवाग्राम रेल्वे स्थानक, स्थानिक गोल बाजार परिसर, महात्मा गांधी पुतळा चौक ते इंदिरा गांधी पुतळा चौक पर्यंत नवीन लोखंडी खांब उभारून त्यावर एईडी पथदिवे बसविणे.
रोटरी क्लब गांधी सिटी वर्धा तर्फे हॅप्पी स्कूल अंतर्गत अंगणवाडी दत्तक घेणेबाबत महाराणा प्रताप प्राथमिक शाळेंतर्गत नव्याने अंगणवाडी सुरू करून अंगणवाडी सोबत शाळा विकसित करण्याबाबत शिक्षण समिती सभा २६ आॅक्टोबर २०१८ विषय क्र. ३ अन्वये मंजुरी प्रदान करणे.