सर्वसाधारण जेतेपद पोलीस मुख्यालयाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 11:22 PM2017-09-15T23:22:22+5:302017-09-15T23:22:40+5:30
येथील जिल्हा क्रीडा मैदानावर आयोजित पोलीस क्रीडा स्पर्धेचे सर्वसाधाण जेतेपद पोलीस मुख्यालयाने पटकाविले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : येथील जिल्हा क्रीडा मैदानावर आयोजित पोलीस क्रीडा स्पर्धेचे सर्वसाधाण जेतेपद पोलीस मुख्यालयाने पटकाविले. विजेत्या चमुला जिल्हा पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांच्या हस्ते चषक देण्यात आला.
पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या स्पर्धेचा समारोप गुरुवारी झाला. सायंकाळी झालेल्या कार्यक्रमाला पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात मानवंदना देत प्रारंभ झाला. राखीव पोलीस निरीक्षक एस.एस. उईके यांच्या मार्गदर्शनात राखीव पोलीस उपनिरीक्षक बोरकुटे यांनी मुख्यालयासह जिल्ह्यातील चारही उपविभागातील १२० खेळाडूंनी शानदार पथसंचलन करीत मान्यवरांना मानवंदना दिली.
पोलीस अधीक्षक व प्रमुख पाहुण्यांनी विजयी स्पर्धकांना बक्षीस वितरण केले. सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू म्हणून पोलीस मुख्यालयाचा वैभव जगने, सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून पोलीस मुख्यालयाच्या सुनैना डोंगरे यांची निवड करण्यात आली. तसेच जनरल चॅम्पियनशीप पोलीस मुख्यालयाला प्रदान करण्यात आले. सदरच्या स्पर्धेत खेळ प्रमुख दिलीप थाटे तसेच सहाय्यक टिम मॅनेजर नागपूर परीक्षेत्र राजू उमरे यांनी सहकार्य केले.
पोलीस उपअधिक्षक सुभाष सावंत यांनी समारोपीय मार्गदर्शनात स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यात मोलाचे सहकार्य केले त्यांचे अभिनंदन केले. तसेच ज्यांना या स्पर्धामध्ये अपयश आले त्यांनी खचून न जाता जिद्दीने व नव्या उमेदनीने प्रयत्न करून कौशल्यपणाला लावून सांघिक भावनेने विजयश्री खेचून आणण्याचा प्रयत्न करावा, असे सांगितले. पुढे होवू घातलेल्या नागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धामध्ये वर्धा जिल्ह्यातील सर्व खेळाडूंनी यशाचे शिखर गाठणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.