भूगर्भाची चाळण; महिनाभरात ५४५ बोअरवेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 12:27 AM2019-01-14T00:27:18+5:302019-01-14T00:28:14+5:30
पाण्याची टंचाई लक्षात घेता संधीच सोनं करण्यासाठी काहींनी ३१ डिसेंबरनंतर बोअरवेल करण्यावर बंदी येणार असल्याची अफवा उडविली. यामुळे पाण्याची समस्या सोडविण्यासाठी नागरिकांनी बोअरवेल खोदण्याचा सपाटा सुरू केला.
गौरव देशमुख।
लोकमत न्यूज नेटवर्क
वायगाव (नि.) : पाण्याची टंचाई लक्षात घेता संधीच सोनं करण्यासाठी काहींनी ३१ डिसेंबरनंतर बोअरवेल करण्यावर बंदी येणार असल्याची अफवा उडविली. यामुळे पाण्याची समस्या सोडविण्यासाठी नागरिकांनी बोअरवेल खोदण्याचा सपाटा सुरू केला. त्यासाठी बोअरवेल व्यावसायिकांनी दुसऱ्या राज्यातून मशीन आणून रात्रंदिवस जमीन पोखरली. एकट्या वायगावातच महिनाभरात तब्बल ५४५ बोअरवेल खोदण्यात आल्या असून यातून कोट्यवधींची उलाढाल झाली. हीच अवस्था जिल्ह्यात इतरही ठिकाणची असल्याने या अफवेचे किती बळी पडले असावेत, हा संशोधनाचा विषय ठरला आहे.
वर्धा तालुक्यात मागील दोन वर्षापासून पाण्याच्या टंचाईचा सामना करावाल लागत आहे. याहीवर्षी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलपासुनच पाण्याच्या झळा सोसाव्या लागत आहे. गावात पाणी पुरवठा करण्याकरिता जीवन प्राधिकरणची पाणी पुरवठा योजना आहेत. पण, पाणी टंचाईमुळे गावाला दहा ते पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा होतो. त्यामुळे गावात पाणीबाणी निर्माण झाली असून येत्या दिवसात हे पाणी संकट आणखीच तीव्र होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी भूगर्भातील पाण्याचा शोध सुरु केला. याचाच फायदा घेत ३१ डिसेंबरनंतर बोअरवेल करण्यावर बंदी येणार असल्याच्या वावड्या उठविण्यात आल्या. या नागरिकांनी चांगल्याच मनावर घेतल्याने सर्वांनीच ३१ डिसेंबरच्या आता बोअरवेल करण्याचा सपाटा सुरु केला. बोअरवेल व्यावसायिकांनीही बोअरवेल करण्याचे व केसींगचे दर वाढवून आपले उखळ पांढरे केले. सुरुवातीला ८० ते ८५ रुपये प्रति फुट असलेला दर १०० रुपयांवर नेला तर केसींगचा १५० ते १६० रुपये प्रति फुट असलेला दर हा दोनशे रुपये करुन नागरिकांचा खिसा खाली केला. पाण्याच्या काळजीपोटी चिंतेत असलेल्या नारिकांनी बोअरवेल करण्याची मागणी केल्याने ही मागणी पुर्ण करण्यासाठी वर्ध्यातील मशीनी कमी पडू लागल्याने बाहेर राज्यातून दहा ते पंधरा मशीन बोलाविण्यात आल्या होत्या. दिवस-रात्र मशीन चालवून वायगावात १ डिसेंबर ते २ जानेवारी या एका महिन्याच्या कालावधीत ५४५ बोअरवेल करण्यात आल्या. एका बोअरवेलकरिता ४० ते ५० हजार रुपये खर्च असल्याने एकाच महिन्यात कोट्यवधीची उलाढाल झाल्याने; एका अफवेमुळे पाण्यासाठी वायगावकरांनी पाण्यासारखा पैसा खर्च केल्याचे दिसून येत आहे.
पाण्याच्या शोधात एकाच घरी खोदल्या दोन ते तीन बोअरवेल
वायगावातील नागरिकांनी पाणी मिळविण्यासाठी चालविलेल्या या स्पर्धेमुळे भूगर्भातील पाणीही संपुष्टात येत आहे. एका घरी बोअरवेल केल्यानंतर पाणी लागले नाही तर लागलीच दुसºया ठिकाणी बोअरवेल करुन पाण्याचा शोध घेण्यासाठी जमीन पोखरण्यात आली. इतकेच नाही तर कमी पाणी लागले असता जास्त पाण्याच्या शोधातही जमीन पोखरुन एकाच घरी दोन ते तीन बोअरवेल केल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे पाण्यासाठी जिकडेतिकडे भूगर्भाची चाळणी सुरु असल्याने आता बोअरवेलला लागलेले पाणीही फार काळपर्यंत टिकण्याची शक्यता नसल्याचेही नागरिकांकडूनच बोलले जात आहे.
उसणवारी पैशातून केली पाण्याची सोय
बोअरवेलवर बंदी असल्याने गावात बोअरवेल करण्याचा सपाटा सुरु झाला. नागरिकांनी १०० ते २०० फुटापर्यंत पाण्याचा शोध घेतला. एका पाठोपाठ एक असा बोअरवेलचा सपाटा सुरु झाल्याने नागरिकांनी पाण्याची भविष्यकालीन तरतूद करण्यासाठी बोअरवेलला पसंती दिली. यावर्षी उत्पादनातही कमालीची घट झाल्याने हातात पैसा नसतानाही पाणी जीवानावश्यक असल्यामुळे उसणवारी व व्याजाने पैसे घेऊन बोअरवेल केल्याचेही उदाहरण पहावयास मिळत आहे. या एका अफवेने भूगर्भही पोखरला असून नागरिकांनाही कर्जबाजारी केले आहे.
पाणी उपसले, आता जिरवायलाही शिकावे
दुष्काळी परिस्थितीमुळे भूगर्भातही पाणी खोलवर गेले आहे. आपण आहे तेवढे पाणी उपसण्यासाठी सदैव तत्पर असतो. पण, बोअरवेलचे प्रमाण दुप्पट-तिप्पट वाढल्याने भूगर्भातील पाणीही फार काळ टिकणार नाही. त्यामुळे आपण जसे पाणी उपसतो तसेच जमिनीत पाणी मुरविण्यासाठी तत्पर असले पाहिजे. त्याकरिता जलपुनर्भरणावर भर द्यावी. घराच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी हे जमिनीत मुरवावे, पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन जलतज्ज्ञांकडून केले जात आहे.