दारूविक्रेत्यांना लगाम घालून दारूबंदी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 09:47 PM2019-07-29T21:47:06+5:302019-07-29T21:47:38+5:30
वर्धा जिल्ह्याला गांधी जिल्हा घोषित करून यात दारूबंदी करण्यात आली. याला अनेक वर्षे लोटले असून पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादामुळे जिल्ह्यात खुलेआम दारू विकल्या जात असते, हे वास्तव असून वेळोवेळी वॉश आऊट केल्या जात असतानाही पुलगाव शहरात अवैधरीत्या मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : वर्धा जिल्ह्याला गांधी जिल्हा घोषित करून यात दारूबंदी करण्यात आली. याला अनेक वर्षे लोटले असून पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादामुळे जिल्ह्यात खुलेआम दारू विकल्या जात असते, हे वास्तव असून वेळोवेळी वॉश आऊट केल्या जात असतानाही पुलगाव शहरात अवैधरीत्या मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत आहे. त्याचा परिणाम परिसरातील सर्व सामान्य कुटुंबावर होत आहे. खून, मारामारी घरफोडी या गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. त्याचा परिणाम समाजाच्या मानसिकतेवर होत असून शहरातील दारू विक्रेत्यावर लगाम घालून अवैध दारूविक्रीवर अंकुश घालावा, अशी मागणी शहरातील डॉ.आंबेडकर नगर भागातील ३०० महिला कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.
महिलांनी केलेल्या तक्ररीनुसार डॉ. आंबेडकर नगर भागात खुलेआम दारू विकल्या जात आहे. ही दारू मानवी शारिरीक दृष्ट्या विषारीयुक्त असून शरिराला घात करणारी आहे. दारू पिणाऱ्यांना बरेच प्रकारचे आजार होवून अनेकांचा बळीही गेला आहे. तर अनेकांना मेंदूचे, आतडी, फुफ्फुसाचे, किडनीचे, रक्ताचे शरीर कंपाचे आजाराने ग्रासलेले आहेत. आंबेडकर नगर येथील आठवडी बाजार परिसरात अल्पवयीन मुले, विद्यार्थ्यांना गांजा, चरस याची नशा करण्याची सवय लागली आहे.
आंबेडकरनगरमध्ये गरीब कुटुंब मोठ्या प्रमाणात वास्तव्याला आहेत. सदर कुटूंबातील लोक मोलमजुरी व कामधंदा करून आपले कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. परंतु या भागात होत असलेल्या अवैद्य दारू विक्रीमुळे व या दारू सेवनामुळे घरात दररोजची भांडण, झगडे, मारामारी होवून कलह व अशांती निर्माण झाली आहे. त्यामुळे आमच्या मुला बाळांवर, शैक्षणिक, मानसिक परिणाम होवून सुख, शांती हिरावून घेतली गेली असल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे.
मागील कित्येक वर्षांपासून सुरू असलेली दारू विक्रेत्यांची दादागिरी, गुंडगिरी, झुंडशाही सुरूच आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना अश्लिल शिवीगाळ, मारझोड करणे, चाकु, सुरे, भाले, फरशे तलवारी काढणे, वॉर्डात दहशतीचे वातावरण निर्माण करून खुनांची व जीवे मारण्याची धमकी देणे, असा प्रकार सर्रास सुरू आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
१५ दारूविक्रेत्यांचा उच्छाद, महिला व मुली त्रस्त
येण्याजाणाऱ्या रस्त्यावर उभे राहून तरूण महिला, मुली, विद्यार्थ्यांना अश्लिल चाळे करणे यामुळे परिसरातील महिला, विद्यार्थीनी, ज्येष्ठ नागरिकांना या दारूविक्रेत्यांच्या घरासमोरून जाताना जीव मुठीत घेवून जावे लागत आहे. येथील १४-१५ दारू विक्रेत्यांनी घातलेल्या उच्छादामुळे राहणे, चालणे, फिरणे, जगणे मुश्कील झाले असल्याचा आरोपही निवेदनातून पोलीस प्रशासनाला कल्पना परिहार, आशा नंदेश्वर, रेखा सहारे, कविता सरदारे, जीजा वांदिले, शालू जांभुळकर, माया सरदारे यांच्यासह २५० महिलांनी केला आहे.