उन्हाळ्यातील लॉकडाऊन काळात मिळेल मुबलक पाणी; वर्धेकरांसाठी शुभवार्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 02:46 PM2020-04-24T14:46:04+5:302020-04-24T14:46:31+5:30
गत वर्षी याच प्रकल्पाने उन्हाळ्याच्या सुरूवातीला तळ गाठल्याने वर्धेकरांना भीषण जलसंकटाला तोंड द्यावे लागले होते. यंदाच्या वर्षी या प्रकल्पात सध्यास्थितीत ४५.३६ टक्के जलसाठा असल्याने कोरोनाच्या संकटातही वर्धेकरांना मुबलक पाणी मिळणार आहे.
लोकमत न्यूज
वर्धा: वर्धा शहरातील १७ हजार तर वर्धा शहराशेजारील १८ हजार कुटुंबीयांच्या तृष्णातृप्तीसाठी महाकाळी येथील धाम प्रकल्प उपयुक्त ठरतो. पण, गत वर्षी याच प्रकल्पाने उन्हाळ्याच्या सुरूवातीला तळ गाठल्याने वर्धेकरांना भीषण जलसंकटाला तोंड द्यावे लागले होते. असे असले तरी यंदाच्या वर्षी या प्रकल्पात सध्यास्थितीत ४५.३६ टक्के जलसाठा असल्याने आणि वर्धा पाटबंधारे या उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन केल्याने कोरोनाच्या संकटातही वर्धेकरांना मुबलक पाणी मिळणार आहे.
प्राप्त माहितीनुसार, पावसाळ्याच्या दिवसात सुरूवातीला पावसाने हुलकावणी दिली. परंतु, नंतर वेळोवेळी झालेल्या पावसामुळे धाम प्रकल्प १०० टक्के भरला. धाम प्रकल्पाची एकूण जीवंत पाणी साठवण क्षमता ५९.४८५ दलघमी आहे. या प्रकल्पाद्वारे ९ हजार ५०० हेक्टरवरील शेतजमिनीला सिंचनासाठी पाणी दिले जाते. आतापर्यंत वर्धा पाटबंधारे विभागाच्यावतीने महाकाळी येथील धाम प्रकल्पातून चार वेळा सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले आहे. वर्धा पाटबंधारे विभागाच्यावतीने शेतकरी हित लक्षात घेऊन धाम प्रकल्पातून आतापर्यंत एकूण ३२.०२ दलघमी पाणी सिंचनासाठी सोडले आहे. तर प्रत्येक महिन्याला ५ दलघमी पाणी पिण्यासाठी सोडण्यात येणार आहे. एकूणच वर्धा पाटबंधारे विभागाच्या प्रभावी नियोजनामुळे यंदा वर्धा तसेच वर्धा शहराशेजारील गावांमधील नागरिकांना कोरोनाच्या संकटातही उन्हाळ्यात मुबलक पाणी मिळणार आहे.
गत वर्षी होता केवळ ६.२४ दलघमी जलसाठा
गत वर्षी उन्हाळ्याच्या दिवसात वर्धेकरांना भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागले होते. इतकेच नव्हे तर वर्धा न.प. आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्यावतीने तब्बल आठ दिवसानंतर नागरिकांना पाणी पुरवठा केल्या जात होता. गत वर्षी २४ एप्रिलला धाम प्रकल्पात केवळ ६.२४ दलघमी इतकाच जीवंत जलसाठा होता. तर सध्यास्थितीत महाकाळीच्या धाम प्रकल्पात २६.९८ दलघमी जीवंत जलसाठा आहे.