पाणी जिरवा, मिळवा मालमत्ताकरात सूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 10:19 PM2019-06-10T22:19:54+5:302019-06-10T22:20:10+5:30
शहर आणि लगतच्या परिसरात दुष्काळ पडला आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी खाली गेली आहे. ही आपल्या सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे. या समस्येचा सामना करण्यासाठी प्रत्येकाने रेन वॉटर हार्वेस्टिंग करून पाणी जमिनीत जिरवावे. जो मालमत्ताधारक पावसाचे पाणी यशस्वीपणे जमिनीत जिरवेल, त्याला पालिका वार्षिक मालमत्ता करात दोन टक्के सवलत देईल, अशी घोषणा नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहर आणि लगतच्या परिसरात दुष्काळ पडला आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी खाली गेली आहे. ही आपल्या सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे. या समस्येचा सामना करण्यासाठी प्रत्येकाने रेन वॉटर हार्वेस्टिंग करून पाणी जमिनीत जिरवावे. जो मालमत्ताधारक पावसाचे पाणी यशस्वीपणे जमिनीत जिरवेल, त्याला पालिका वार्षिक मालमत्ता करात दोन टक्के सवलत देईल, अशी घोषणा नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी केली.
वर्धा शहरातील पाणीटंचाई व जमिनीतील खोल गेलेली पाण्याची पातळी या समस्येचा सामना करण्याच्या दृष्टीने नगरपालिका प्रशासनाच्या वतीने स्थानिक विकास भवनात जलजागृती कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार रामदास तडस होते. यवतमाळ येथील जलतज्ज्ञ नितीन खर्चे, एकात्मिक पाणलोट विकास व व्यवस्थापन समिती तज्ज्ञ व तामसवाडा प्रकल्पाचे प्रणेते माधव कोटस्थाने, डॉ. सचिन पावडे प्रामुख्याने उपस्थित होते.
नगर परिषदेच्या वतीने रामदास तडस यांचा खासदार म्हणून सलग दुसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात प्रोजेक्टरचा वापर करून उपस्थित सर्व मान्यवरांनी वेगवेगळ्या रितीने पावसाचे पाणी कशा रितीने जमिनीत जिरवायचे ते सांगितले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, नगर परिषद कर्मचारी, नगरसेवक तथा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाणी हे जीवन आहे व त्याचा जपून वापर करावा, अशी प्रतिज्ञा घेत हा जल जागृती कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी केले. नगराध्यक्ष, उपाध्यक्ष प्रदीपसिंग ठाकूर, पाणीपुरवठा विभागाचे सभापती सचिन पारधे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. नागरिकांनी पाण्याचे महत्त्व जाणून घेत भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पावसाच्या पाण्याचे नियोजन करावे, याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.