डॉक्टरांसह औषध मिळणे झाले कठीण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 09:21 PM2019-04-22T21:21:17+5:302019-04-22T21:21:43+5:30
येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर नसल्याने व साध्यासाध्या औषधीही रुग्णांना मिळत नसल्याने रुग्णालय शोभेची वास्तू ठरत आहे. इतकेच नव्हे तर येथील कामकाज नर्सच्या माध्यमातून पूर्ण केल्या जात असल्याने आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. आष्टीच्या रुग्णालयात पुरेशा सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या, अशी मागणी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर नसल्याने व साध्यासाध्या औषधीही रुग्णांना मिळत नसल्याने रुग्णालय शोभेची वास्तू ठरत आहे. इतकेच नव्हे तर येथील कामकाज नर्सच्या माध्यमातून पूर्ण केल्या जात असल्याने आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. आष्टीच्या रुग्णालयात पुरेशा सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या, अशी मागणी आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेवर ग्रामीण रुग्णालय झाल्यामुळे नागरिकांना चागल्या दर्जेदार आरोग्य सूविधा मिळेल अशी आशा होती. वैद्यकीय अधिकारी म्हणून महिला डॉक्टरची नेमणूक केली; पण तपासणीच्या मशनरी चालवायला डॉक्टर, लिपिकवर्ग, परिचारीका, एक्सरे मशीनचा टेक्निशियन, विविध विभागात आरोग्य तपासणीसाठी वैद्यकीय अधिकारी वर्गच उपलब्ध नाही. पिण्याच्या पाण्याभोवताल अस्वच्छतेने कळस गाठला आहे. शिवाय शौचालयाचीही हिच अवस्था आहे. रुग्ण खाटांवर कुठे गादी तर कुठे चादरच नसते. शिवाय पुरेसा औषध साठाच या रुग्णालयात नसल्याने याचा नाहक त्रास रुग्णांसह रुग्णांच्या नातेवाईकांना सहन करावा लागत आहे.
येथे ओपीडी सुरू झाल्यावर रुग्णांना तासंतास वैद्यकीय अधिकाऱ्याची प्रतीक्षा करावी लागते. जिल्हा शल्य चिकित्सकांकडे डॉक्टरांचे आलेले आदेश आष्टीला पोहोचत नाहीत. या रुग्णालयात स्वच्छता कर्मचारी नाही. तसेच रुग्णवाहिकाही नाही. त्यामुळे रुग्णांना अनेकदा आर्वी, वर्धा, अमरावती किंवा नागपूर गाठावे लागते. येथे सोई-सुविधा देण्याची मागणी आहे.
वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज
आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना चांगली आरोग्य सेवा मिळावी या हेतूने वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही सदर विषयी लक्ष देत तात्काळ योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे. यापूर्वी नागरिकांकडून आंदोलनकरून सदर विषयी आरोग्य विभागातील अधिकाºयांचे लक्ष वेधण्यात आले होते. त्यावेळी आश्वासनाअंती आंदोलन मागे घेण्यात आले होते. परंंतु, त्यानंतर अधिकाºयांचे आश्वासन हवेतच विरल्याचे दिसून येत आहे.
तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवा कधी?
कान-नाक-घसा, मेडिसीन, आॅथोपॅडीक, नेत्रचिकित्सक, दंतचिकित्सक, रक्त तपासणी, लसीकरण यासाठी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारीच या रुग्णालयात देण्यात आलेला नाही. तज्ज्ञांकडून रुग्णांना उपचार केव्हा मिळणार, असा प्रश्न विचारला जात आहे.
ग्रामीण रुग्णालयात अपुºया सुविधा प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सकांना माहिती देण्यात आली आहे. परंतु, त्यांच्याकडून देण्यात आलेले आश्वासन केवळ आश्वासनच राहत ते कागदावरच आहे. परिणामी, सामान्य जनतेचे हाल होत आहे. याविरोधात आपण पुन्हा आंदोलन उभारणार.
- मकरंद देशमुख, जनशक्ती संघटना, आष्टी (शहीद).