घोराड-कोलगाव रस्ता खड्ड्यात

By admin | Published: August 18, 2016 12:44 AM2016-08-18T00:44:44+5:302016-08-18T00:44:44+5:30

गत तीन वर्षांपूर्वी घोराड -कोलगाव रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. या मार्गावरील पुलाची यावेळी डागडुजी करण्यात आली होती.

In Ghorad-Kolgaon road pothole | घोराड-कोलगाव रस्ता खड्ड्यात

घोराड-कोलगाव रस्ता खड्ड्यात

Next

पुलाला पडले भगदाड : अपघाताची शक्यता बळावली
सेलू : गत तीन वर्षांपूर्वी घोराड -कोलगाव रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. या मार्गावरील पुलाची यावेळी डागडुजी करण्यात आली होती. मात्र आता या पुलाला भगदाड पडले असून डांबरीकरण उखडले आहे. घोराड-कोलगाव रस्त्याची पुरती वाट लागल्याने मार्गक्रमण करणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
घोराड येथून कोलगावमार्गे जुनगड, चौकी, कान्होलीबारा, नागपूर कडे जाणारा मार्ग आहे. हा रस्ता शेतकऱ्यांच्या वहिवाटीचा आहे. परिसरातील शेतकऱ्यांच्या शेती या रस्त्याला लागून आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले. यात कोलगाव वरुन दोन कि़मी. अंतराचे डांबरीकरण करण्यात आले; मात्र घोराड वरुन दोन कि़मी.चे डांबरीकरण व खडीकरण रखडले होते. कालांतराने या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र अल्पावधीतच रस्ता उखडला. त्यानंतर तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचा दौरा असताना या रस्त्याची सरफेसिंग व पुलाची डागडुजी करण्यात आली होती. मात्र हे काम वर्वरचे असल्याने अवघ्या काही वर्षात रस्त्याची दुरावस्था झालेली दिसते. त्यामुळे या मार्गाने जडवाहन घेऊन जाणे शक्य होत नाही. आता तर बैलगाडी नेणे कठीण झाले असून या रस्त्याची केवळ दुरुस्ती न करता नव्याने खडीकरण व मजबुतीकरण करावे, अशी मागणी आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुला नाल्याचे बांधकाम करण्याची आवश्यकता आहे.
विकास कामासाठी निधी उपलब्ध करुन देत असल्याचा गवगवा लोकप्रतिनिधी करीत असले तरी पांदण रस्ते, ग्रामीण भागातील रस्त्याची होत असलेली दैनावस्था पाहुन यावर प्रश्नचिन्ह निर्माण होते. या रस्त्याचे अच्छे दिन कधी येणार, असा प्रश्न परिसरातील नागरिक विचारतात. याबाबत कार्यवाहीची ग्रामस्थांना प्रतिक्षा आहे.(शहर प्रतिनिधी)
रस्त्याचे त्वरित बांधकाम करण्याची मागणी
या रस्त्यावर असलेला नाल्यावर पूल असून त्याला भगदाड पडले आहे. या पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून सळाखी उघड्या पडल्या आहे. अल्पावधीतच पुलाचे बांधकाम उखडले आहे. हे बांधकाम निकृष्ट झाल्याची ओरड ग्रामस्थातून होत आहे.
रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून पावसाळ्याचे दिवस असल्याने त्या खड्यात पाणी साचते. वाहनधारकांना याचा अंदाज येत नसल्याने अपघाताचा धोका बळावला आहे.

Web Title: In Ghorad-Kolgaon road pothole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.