वर्ध्यात जपानी ज्वराने चिमुकलीचे निधन; आरोग्य विभागाला आली अखेर जाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 11:34 AM2019-08-22T11:34:25+5:302019-08-22T11:44:21+5:30
भारतात प्रथमच आढळून आलेला या आजाराला जपान एन्सेफलायटिस असेही म्हणतात. एखाद्या व्यक्तीला क्लूलेक्स नावाचा डास चावल्यास त्याला हा आजार होतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: रविवारी हंसत खेळत असलेल्या परी कपिल कुमरे (५ ) या चिमुकलीचे दुर्धर अशा जपानी ज्वराने बुधवारी (दि. २१) आकस्मिक निधन झाले. सिंदी मेघे येथील रहिवासी असलेल्या कपिल कुमरे यांची परी ही मुलगी रविवारी आपल्या घराच्या अंगणात खेळत असताना तिची प्रकृती अचानक बिघडली. तिला सडकून ताप चढला. तिला सेवाग्राम रुग्णालयात नेले असता त्यांनी तात्काळ दाखल करून घेतले. मात्र तीन दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या परीने बुधवारी रात्री आपला अखेरचा श्वास घेतला.
तिला जपानी मस्तिष्क ज्वराने ग्रासल्याचे निदान येथील डॉक्टरांनी केले आहे. भारतात प्रथमच आढळून आलेला या आजाराला जपान एन्सेफलायटिस असेही म्हणतात. एखाद्या व्यक्तीला क्लूलेक्स नावाचा डास चावल्यास त्याला हा आजार होतो. डास चावल्यानंतर त्याच्या मेंदूला सूज येते व यातच त्याचे निधन होते. अस्वच्छ परिसरात या आजाराला पसरविणारे डास वाढत असल्याची माहिती आहे.
आरोग्य विभाग झाला जागा
चिमुकल्या परीच्या प्रकृती बिघडण्यामागचे कारण कळताच आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सिंदी मेघेला भेट देत परिसराची पाहणी केली.