आजारपणाने मृत्यू झाला; मुलीचा मृतदेह घरातच पुरला, आठवड्यानंतर धक्कादायक घटना उजेडात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 11:06 AM2023-07-14T11:06:38+5:302023-07-14T11:09:06+5:30

जन्मदात्यांसह भावास घेतले ताब्यात

girl died of illness; her body buried in the house by parents as they have no money for funeral, incident came to light a week later | आजारपणाने मृत्यू झाला; मुलीचा मृतदेह घरातच पुरला, आठवड्यानंतर धक्कादायक घटना उजेडात

आजारपणाने मृत्यू झाला; मुलीचा मृतदेह घरातच पुरला, आठवड्यानंतर धक्कादायक घटना उजेडात

googlenewsNext

वर्धा : काही महिन्यांपासून आजारी असलेल्या मुलीचा घरातच मृत्यू झाला. परिस्थिती हलाखीची अन् जन्मदाते वेडसर प्रवृत्तीचे. अशातच अंत्यसंस्कार कोण करणार, असा प्रश्न वडिलांनी उपस्थित केला आणि मग काय चक्क भावाने घरातच खड्डा खणून वेडसर बहिणीचा मृतदेह पुरला. ही धक्कादायक घटना तब्बल १० दिवसांनंतर १३ रोजी उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. प्रविणा साहेबराव भस्मे (वय ३७) रा. आदर्शनगर असे मृत तरुणीचे नाव आहे, तर सेवाग्राम पोलिसांनी वडील साहेबराव चिंदुजी भस्मे (६८), आई मंदा साहेबराव भस्मे (६४), भाऊ प्रशांत साहेबराव भस्मे (३५) यांना ताब्यात घेतले.

प्राप्त माहितीनुसार, मृत प्रविणा मागील काही महिन्यांपासून आजाराने त्रस्त होती. ती वेडसर वृत्तीची असल्याने घराबाहेर कुठेही फिरत नव्हती. अशातच ३ जुलै रोजी रात्री सायंकाळी ७:३० वाजताच्या सुमारास प्रविणाचा घरीच मृत्यू झाला. आता अंत्यसंस्कार कोण करणार, पैसे कोठून आणणार असे अनेक प्रश्न कुटुंबीयांसमोर उभे झाले. रात्रभर विचार करून दुसऱ्या दिवशी ४ रोजी सकाळी ७ वाजता मुलीचा मृतदेह घरातच खड्डा खणून पुरविण्यात आला. याबाबतची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांना १३ रोजी दुपारी १२ वाजता मिळाली. पोलिसांनी तत्काळ आदर्शनगर गाठून घराची पाहणी केली असता घरात खड्डा खणल्याचे दिसून आले. पोलिसांनी तत्काळ याची माहिती तहसीलदार रमेश कोळपे यांना दिली. रात्री ७ वाजता फॉरेन्सिक चमूसह वैद्यकीय अधिकाऱ्यांची चमू घटनास्थळी दाखल झाली आणि मृतदेह खड्ड्याबाहेर काढला.

पुरलेल्या मातीवर ठेवल्या होत्या लाकडी पाट्या

वडील साहेबराव आणि भाऊ प्रशांत यांना पोलिसांनी प्रविणाबाबत विचारपूस केली असता, प्रविणाला घरातच पुरल्याची माहिती त्यांनी दिली. पोलिसांनी प्रविणाचे घर गाठत पाहणी केली असता मृतदेह पुरलेल्या ठिकाणी मातीवर लाकडी पाटा आणि त्यावर दगड, विटा ठेवल्याचे दिसून आल्याचे पोलिसांनी सांगितले.

पुरलेल्या मृतदेहावर झोपायचे वडील

भस्मे कुटुंबातील सर्वच सदस्य वेडसर प्रवृत्तीचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच मुलगी प्रविणाचा मृतदेह ज्या ठिकाणी पुरला होता त्यावर लाकडी पाट्या टाकून वडील साहेबराव त्यावर झोपायचा. त्याच्या बाजूलाच भाऊ पलंगावर झोपायचा. अखेर दहा दिवसांनंतर हा धक्कादायक प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली.

पाऊणतास चालले खोदकाम...

प्रविणाचा मृतदेह ज्या ठिकाणी पुरला होता, त्या ठिकाणी तहसीलदार रमेश कोळपे, नायब तहसीलदार बाळू भागवत, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांच्या समक्ष सायंकाळी ७:३० वाजता दोन मजुरांच्या मदतीने खोदकाम सुरू झाले. तब्बल पाऊणतास खोदकाम झाल्यावर प्रविणाचा मृतदेह खड्ड्याबाहेर काढण्यात आला.

घटस्थळीच मृतदेहाचे केले शवविच्छेदन

मृतदेह खड्ड्यात पुरून तब्बल दहा दिवसांचा कालावधी लोटून गेला होता. रात्रीची वेळ असल्याने लाईटच्या उजेडात मृतदेहाचे शवविच्छेदन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चमूंकडून घटनास्थळीच करण्यात आले. मृतदेहावर अंत्यविधी पार पाडण्यासाठी नजीकच्या स्मशानभूमीत व्यवस्थाही करण्यात आली होती.

दोन वर्षांपूर्वी बहिणीचाही असाच मृत्यू

मृत प्रविणा हिची मोठी बहीण हीदेखील वेडसर वृत्तीची होती. अशाच प्रकारे २०२० मध्ये तिचादेखील मृत्यू झाल्याचे परिसरातील नागरिकांकडून सांगण्यात आले.

घटनेनंतर उलटसुलट चर्चेला उधाण

भस्मे कुटुंबातील सदस्य वेडसर वृत्तीचे असल्याने कुणासोबतही ते बोलत नव्हते. वडील आणि भाऊ रोजमजुरीच्या कामाला जायचे. अशातच ३ रोजी गुरुपौर्णिमा होती आणि याच दिवशी तिचा मृत्यू झाला असे तर्कवितर्क लावून परिसरातील नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण फुटले होते. मात्र, पुढील तपास पोलिस करीत असून वैद्यकीय अहवाल आणि पोलिस तपासानंतरच सर्व बाबी स्पष्ट होणार आहेत.

Web Title: girl died of illness; her body buried in the house by parents as they have no money for funeral, incident came to light a week later

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.