वडिलांना दिला मुलीने खांदा व भडाग्नी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:07 AM2018-05-14T00:07:12+5:302018-05-14T00:07:12+5:30
उमेद प्रकल्पाद्वारे संचालित रोठा येथील संकल्प प्रकल्पाच्या संचालक मंगेशी मून यांचे वडील देवराव रामचंद्र पुसाटे यांचे नुकतेच निधन झाले. देवराव पुसाटे यांना मुलं असतानाही मंगेशी मून यांनी आपल्या वडीलांना खांदा व अग्नी देऊन एक सामाजिक संदेश या निमित्ताने दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : उमेद प्रकल्पाद्वारे संचालित रोठा येथील संकल्प प्रकल्पाच्या संचालक मंगेशी मून यांचे वडील देवराव रामचंद्र पुसाटे यांचे नुकतेच निधन झाले. देवराव पुसाटे यांना मुलं असतानाही मंगेशी मून यांनी आपल्या वडीलांना खांदा व अग्नी देऊन एक सामाजिक संदेश या निमित्ताने दिला आहे. त्यांच्यावर शेतातच अंत्यसंस्कार करून त्यांच्या अस्थी विसर्जित न करता जमिनीत पुरण्यात आल्या. त्याच ठिकाणी बोधिवृक्ष लावण्यात आला. या वृक्षाचे संगोपन करण्याचा संकल्प पुसाटे कुटंूबीयांनी केला.
जि.प. सदस्य मनीष पुसाटे यांचे वडील माजी पं.स. सदस्य देवराव रामचंद्र पुसाटे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पहाटे ते मॉर्निग वॉक करीत असताना सिंदी मेघे येथील नागठाणा रोडवरील त्यांचेच घराजवळ त्यांना हृदयविकाराचा झटका आला. व त्यातच त्यांचे प्राण गेला. देवराव पुसाटे यांची पत्नी कमल, मुलगा मिलिंद मनीष व मुलगी उमेद चॅरीटेबल ट्रस्टद्वारा संचालित पारधी मुलांचे वसतिगृह संकल्पच्या संचालिता मंगेशी मून व नातवंडे असा आप्तपरीवार आहे. काँग्रेसच्या प्रभाराव यांचे निकटवर्तीय असलेले देवराव पुसाटे हे १९८२ मध्ये पं.स.सदस्य म्हणून निवडून आले. व १९८२ ते १९९२ अशा त्यांच्या राजकीय कार्यकाळात त्यांनी अनेक समाजपयोगी कामे केलीत. यामध्ये सिंदी (मेघे) येथील शांतीनगर ही शासकीय योजनेअंतर्गत ४५ घरांचीवस्ती त्यांच्या प्रयत्नाने निर्माण झाली. तर वर्धा जिल्हा खादी ग्रामोद्योगाचे अध्यक्ष म्हणून १० वर्षांच्या वरील काळापर्यंत कार्यरत होते. तसेच सिंदी (मेघे) ग्रामपंचायतचे सदस्यापासून तर उपसरपंच पदापर्यंत १५ वर्षे सक्रीय राजकारणात कार्यरत होते.