मुलीने परस्पर विकली वडिलांची शेती

By admin | Published: April 11, 2016 02:20 AM2016-04-11T02:20:15+5:302016-04-11T02:20:15+5:30

वडिलांच्या नावावर असलेली शेतजमीन मुलीने परस्परच विकली. यासाठी वडिलांच्या जागेवर दुसऱ्याच व्यक्तीला उभे केले तर दलालाची मध्यस्थी स्वीकारण्यात आली.

The girl sold her mutual father's farming | मुलीने परस्पर विकली वडिलांची शेती

मुलीने परस्पर विकली वडिलांची शेती

Next

पाच जणांवर गुन्हे दाखल : खरेदीदार नागपूरचा रहिवासी
देवळी : वडिलांच्या नावावर असलेली शेतजमीन मुलीने परस्परच विकली. यासाठी वडिलांच्या जागेवर दुसऱ्याच व्यक्तीला उभे केले तर दलालाची मध्यस्थी स्वीकारण्यात आली. हा प्रकार उघड होताच तक्रारीवरून पाच जणांवर शनिवारी गुन्हे दाखल करण्यात आले.
याबाबतची माहिती अशी की, महादेव डोमाजी कामडी यांच्या नावे मौजा चिकणी येथे शेत सर्व्हे क्र. २३४/२ आराजी ०.८१ हेक्टर जमीन आहे. सदर जमीन मुलगी शोभा रामेश्वर साटोणे रा. पवनार हिने परस्पर विकली. विक्री प्रसंगी वडिलांऐवजी दुसऱ्या व्यक्तीला उभे केले. दलालाच्या मदतीने सदर शेताची विक्री करण्यात आले. ही बाबत पोलीस तपासात उघड होताच गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रकांत मदने यांनी दिली.
महादेव कामडी यांचा मृत्यू झाल्यानंतर नरेश महादेव कामडी शेत नावे करण्यासाठी पटवाऱ्याकडे गेले. यावेळी शेत सिद्धार्थ जगदीश तितुरकर (४५) रा. रमाईनगर नागपूर यांना विकल्याचे सांगण्यात आले. या प्रकारामुळे नरेश कामडी यांना धक्काच बसला. त्यांनी विक्रीपत्राची प्रत सहायक निबंधक कार्यालयातून प्राप्त केली. सदर विक्रीपत्रावर महादेव कामडीऐवजी दुसऱ्याच व्यक्तीचा फोटो दिसला. वडील स्वाक्षरी करीत होते; पण विक्री पत्रावर अंगठा लावला होता. यावरून ही विक्री बनावट असल्याचे आढळून आले. यामुळे नरेश यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला.
पोलिसांच्या तपासात पवनार येथे राहणारी मुलगी शोभा रामेश्वर साटोणे हिने पाच व्यक्तींच्या मदतीने वडिलांचे शेत विकल्याचे उघड झाले. यात नागपूर येथील शेत घेणारा सिद्धार्थ जगदीश तितुरकर, दलाल विनोद ईश्वर फुलकर रा. हिंगणघाट, सिमा वसंत कांबळे रा. मोहननगर वर्धा, मुलगी शोभा रामेश्वर साटोणे रा. पवनार, गजानन राघोराव शिंदे रा. हिंगणघाट व मन्साराम उईके रा. सावंद (जि.वर्धा) यांचा समावेश आहे. या सर्वांवर भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सर्व आरोपींनी मिळून महादेव कामडी यांचे शेत १८ आॅक्टोबर २०१४ मध्ये सिद्धार्थ तितुरकर याला विकले; पण शेताचा कब्जा दिला नव्हता. यामुळे शेताची विक्री झाली नसल्याचे कुणालाही माहिती नव्हते. कायदेशीर कार्यवाही करण्यास अडचण जाऊ नये म्हणून तितुरकर यांनी शेतावर कब्जा घेण्यास विलंब केला.
याबाबत नरेश कामडी यांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर तपासात हा प्रकार उघडकीस आला. यातील आरोपींना लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहितीही पोलीस निरीक्षक चंद्रकांत मदणे यांनी दिली.(प्रतिनिधी)

Web Title: The girl sold her mutual father's farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.