अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्या
By admin | Published: August 17, 2016 12:53 AM2016-08-17T00:53:13+5:302016-08-17T00:53:13+5:30
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात यावे यासह मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी लहुजी शक्ती ...
मागणी : लहुजी शक्ती सेनेचा मोर्चा
वर्धा : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात यावे यासह मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी लहुजी शक्ती सेनेच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना निवेदन देण्यात आले.
शिवाजी चौकातून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी निवेदनात मातंग समाजाला अ, ब, क, ड आरक्षण देण्यात यावे, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची पुनर्रचना करून नियमित सुरू करावे. लहूजी साळवे अभ्यास आयोगाच्या सर्व अटी मान्य कराव्या. पोलीस बॅन्ड पथकातील पूर्ण जागा मातंग समाजासाठी राखीव कराव्या. प्रत्येक शासकीय ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात दायीन ही पूर्वीप्रमाणे पद निर्माण करून ते मातंग समाजाच्या महिलेकरिता राखीव करावे. मातंग समाजाच्या ५० वर्षांखालील वृद्ध कलावंतास शासनाकडून पेन्शन देण्यात यावी. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व गुरू लहूजी साळवे यांची जयंती महाराष्ट्रातील सर्व शासकीय, निमशासकीय शाळांत साजरी करण्याचे आदेश द्यावे. राज्यातील सर्व शासकीय वाचनालयांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्यावे. जिल्ह्यातील सर्व तालुका कार्यालयासमोर लहूजी साळवे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारावे. अनुसूचित जातीतील सर्व घटकांची सर्वागिण विकास व प्रगती होऊन त्यांचे जीवनमान सुधारण्याकरिता राज्य शासनाच्या समाजकल्याण खाते, कृषी पशू संवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स व्यवसाय विभाग, फलोत्पदान विभाग व इतर खात्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनंत बिहार राज्याप्रमाणेच अ,ब,क,ड नुसार वर्गवारी करून अनु. जातीतील उपेक्षित मातंग समाजाला व इतर जातींना सामाजिक न्याय देण्यात यावा. राज्याच्या वार्षिक अंदाजपत्रकात अनु. जाती योजनेकरिता असलेल्या आर्थिक तरतुदीचे जातीनिहाय वाटप करावे, आदी मागण्या लावून धरण्यात आल्या. निवेदन देताना विदर्भ प्रांत अध्यक्ष डॉ. रूपेश खडसे, जिल्हाध्यक्ष संग्राम कळणे, अमरावती जिल्हाध्यक्ष पंकज जाधव, सरचिटणीस मंगेश प्रधान, सुनील संतापे, गौरी वाघमारे, रमेश भिसे, सतीश पिठे, किशोर बावणे, सुधाकर लांडगे, विनय इंगळे, अनिल पोटफोडे, रंजीत वानखेडे, प्रमोद ससाने, कृष्णा तायवाडे, ईशांत खंडार उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)