भाजपला सद्बुद्धी द्या, वीज दर निम्मे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 06:00 AM2019-12-03T06:00:00+5:302019-12-03T06:00:23+5:30

विजेचे दर निम्मे झाले पाहिजेत याशिवाय बिलावरील अन्यायकारक कर, स्थिर आकार, वीज वहन कर आदी देणार नसल्याचा इशारा यावेळी आनदोलनकर्त्यांनी दिला. विजेचे दर निम्मे होत नाही, तसेच स्वतंत्र विदर्भाची निर्मिती होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र व केंद्र सरकारशी आर्थिक असहकार आंदोलन करीत कर, कर्जा नहीं देंगे, बिजली का बिल भी नहीं देंगे असा निर्धारही यावेळी करण्यात आला.

Give BJP wishes, lower the electricity tariff | भाजपला सद्बुद्धी द्या, वीज दर निम्मे करा

भाजपला सद्बुद्धी द्या, वीज दर निम्मे करा

Next
ठळक मुद्देवेगळ्या विदर्भासाठी बापूंना साकडे : विदर्भ राज्य समितीचा आत्मक्लेष, वर्ध्यातून आंदोलनाला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : भाजपला सद्बुद्धी द्यावी, विदर्भ राज्याची त्वरित निर्मिती करावी, असे विदर्भ राज्य आंदोलन समितीने सोमवारी सेवाग्रामात बापूंना साकडे घातले. यानंतर पदाधिकाऱ्यांनी महात्मा गांधी पुतळा परिसरात आत्मक्लेष करीत आंदोलनाच्या पहिल्या टप्प्याला वर्ध्यातून प्रारंभ केला.
विजेचे दर निम्मे झाले पाहिजेत याशिवाय बिलावरील अन्यायकारक कर, स्थिर आकार, वीज वहन कर आदी देणार नसल्याचा इशारा यावेळी आनदोलनकर्त्यांनी दिला. विजेचे दर निम्मे होत नाही, तसेच स्वतंत्र विदर्भाची निर्मिती होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र व केंद्र सरकारशी आर्थिक असहकार आंदोलन करीत कर, कर्जा नहीं देंगे, बिजली का बिल भी नहीं देंगे असा निर्धारही यावेळी करण्यात आला. प्रारंभी सेवाग्राम येथे प्रार्थना करण्यात आली.
आंदोलनात माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, समितीचे मुख्य संयोजक राम नेवले, महिला आघाडीच्या विदर्भ प्रदेश अध्यक्ष रंजना मामर्डे, मधुसूदन हरणे, शैला देशपांडे, देवीदास लांजेवार, अरुण केदार, केशरवानी, रितेश मासुरकर, अशोक कोल्हे, गणेश शर्मा, पांडुरंग भालशंकर यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश होता. आंदोलनस्थळी हैदराबाद येथील अत्याचार आणि हत्याकांडातील तरुणीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. सायंकाळी निंबू पाणी घेऊन आंदोलनाची सांगता करण्यात आली.

शिवसेनेच्या धाकाने मुद्याला बगल
आंदोलस्थळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राम नेवले म्हणाले, आंदोलनाच्या पहिल्या टप्प्याला सेवाग्राम येथून सुरुवात करण्यात आली. यावेळी गांधींना साकडे घालत भाजपने दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली आणि या सरकारला सद्बुद्धी द्यावी, अशी प्रार्थना केली. वेगळ्या विदर्भासाठी खुद्द भाजपनेच आमगाव ते खामगाव असे यात्रेद्वारे आंदोलन केले. मात्र, सत्तारुढ होताच भाजपने केवळ शिवसेनेच्या धाकाने वेगळ्या विदर्भाच्या मुद्याला बाजूला सारले. या सरकारने जनतेचा विश्वासघात केला, असा आरोपही त्यांनी केला. विदर्भ राज्य आंदोलन समितीने २०२३ पर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्य कसग मिळवून घेता येईल याकरिता सरकारला आर्थिक असहयोग, रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन व वेगळ्या विदर्भाविषयी अखेरच्या गावापर्यंत जागर अशी आंदोलनाची आखणी केली असल्याचे सांगितले. आता युती तुटल्याने स्वतंत्र विदर्भाचा मार्ग सुकर झाल्याचेही ते म्हणाले.
अ‍ॅड. चटप यांनी वेगळ्या विदर्भाविषयी विधानसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे दाखले दिले. विदर्भ राज्य सक्षम असून उत्पन्न १३ हजार कोटींनी वाढल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे वेगळ्या विदर्भाला विरोध करणाऱ्यांची तोंडे बंद झाल्याचेही ते म्हणाले. सरकारला स्वतंत्र विदर्भ देण्यासाठी भाग पाडू, प्रसंगी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू, असाही इशारा दिला.

सात टप्प्यात आंदोलन
आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात स्वतंत्र विदर्भ राज्य होईपर्यंत कर, कर्जा नहीं देंगे, बिजली का बिल भी नहीं देंगे, कर, कर्ज, वीजबिल वसुली व वीज तोडणाऱ्या अधिकाऱ्यांना गावात, मोहल्ल्यात येण्यास मनाई अस फलक जिल्हा, तालुकास्तरावर लावण्यात येणार आहेत.

तिसऱ्या टप्प्यात वीज महावितरणच्या मुख्य अभियंत्याच्या कार्यालयासमोर धरणे व निदर्शने, १० फेब्रुवारीला जिल्हा व तालुकास्तरावर रास्ता रोको, जेल भरो आंदोलन, २५ ला नागपूर येथे रेल रोको आंदोलन, चौथ्या टप्प्यात कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण, पाचव्या टप्प्यात तेलंगणा राज्यात अभ्यास सहल, सहाव्या टप्प्यात सभा, संमेलने, युवक-महिला मेळावे, जनजागृती आणि सातव्या टप्प्यात १ मे २०२० महाराष्ट्र दिन काळा दिवस पाळून संपूर्ण विदर्भ बंद आंदोलन करण्यात येणार आहे.

Web Title: Give BJP wishes, lower the electricity tariff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.