शेतकऱ्यांना द्या बियाणे निवडीचे स्वातंत्र्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 09:23 PM2019-06-24T21:23:20+5:302019-06-24T21:23:33+5:30
राज्यात जनुकीय, जैविक संशोधित बियाण्यांवर पर्यावरण कायदा, बियाणे कायदा व जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत बंदी घातल्याने शेतात संशोधित जैविक, जनुकीय तंत्रज्ञान येणे थांबले आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात कोणते बियाणे वापरायचे हा अधिकार आहे. त्यामुळे ही बंदी उठवून शेतकऱ्यांना बियाणे निवडीचे स्वातंत्र द्यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : राज्यात जनुकीय, जैविक संशोधित बियाण्यांवर पर्यावरण कायदा, बियाणे कायदा व जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत बंदी घातल्याने शेतात संशोधित जैविक, जनुकीय तंत्रज्ञान येणे थांबले आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात कोणते बियाणे वापरायचे हा अधिकार आहे. त्यामुळे ही बंदी उठवून शेतकऱ्यांना बियाणे निवडीचे स्वातंत्र द्यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली.
ना. सुधीर मुनगंटीवार कार्यक्रमाच्या निमित्ताने वर्ध्यात आले होते तेव्हा त्यांना निवेदन देण्यात आले. तसेच आ. डॉ. पंकज भोयर व आ. समीर कुणावार यांच्या निवासस्थानी जाऊन शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले. तसेच खा. रामदास तडस यांनाही दौऱ्यादरम्यान निवेदन देण्यात आले.
राज्यातील कर्जदार शेतकऱ्यांना जून २०१७ च्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या शासन निर्णयाने पिक विमा काढणे बंधनकारक केले आहे. कर्जदार शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यातून बँका हप्त्याची कपात करुन कोट्यवधी रुपये विमा कंपन्यांच्या घशात घालत आहे. मागील ३ वर्षात बोंडअळी व दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शासनाने हेक्टरी अनुदान दिले पण; मोजक्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला.
बँकांनी शेतकºयांकडून वसुल केलेली रक्कम विमा कंपनीला दिल्याने शेतकऱ्यांवरील तेवढेच कर्ज वाढले. त्यामुळे शासनाने विम्याकरिता केलेली सक्ती उठवावी. त्यासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार शेतकऱ्यांना द्यावा, अशीही मागणी केली आहे. यावेळी शेतकरी संघटनेचे मधुसूदन हरण, जिल्हा प्रमुख उल्हास कोंटबकर, गणेश मुटे, मुकेश धाडवे, प्रभाकर झाडे, सुनिल हिवसे, अभिजीत लाखे, मोरेश्वर वाघमारे, साहेबराव धोटे, शांताराम भालेराव, अरविंद बोरकर, खुशालराव हिवरकर, रोहीत हरणे, सौरभ हिवसे, अथर्व भोयर, पियुष ठाकरे, विजय धोटे, अभी चांदूरकर, गौरव भोयर, प्रियांशू फरकाडे, प्रज्ज्वल ठाकरे आदींची उपस्थिती होती.