बांबू कारागिरांना स्वयंरोजगारासाठी अनुदान द्या
By admin | Published: June 3, 2017 12:32 AM2017-06-03T00:32:25+5:302017-06-03T00:32:25+5:30
परिसरातील ५० बांबु कारागिरांनी ग्रामीण औद्योगिक प्रशिक्षण संस्था (एमगिरी) येथे बांबू आर्टचे प्रशिक्षण घेतले.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : १०० लाभार्थ्यांना मंजुरीची प्रतीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : परिसरातील ५० बांबु कारागिरांनी ग्रामीण औद्योगिक प्रशिक्षण संस्था (एमगिरी) येथे बांबू आर्टचे प्रशिक्षण घेतले. या माध्यमातून बांबुपासून उपयुक्त आणि मजबुत वस्तु तयार करण्याचे कौशल्य कारागिरांनी अवगत असले तरी या कारागिरांकडे स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी आवश्यक साहित्य नाही. न्युक्लीअस बजेटमध्ये साहित्याची तरतूद करुन कारागिरांना सहाय्य करण्याची मागणी आहे.
या मागणीचे निवेदन लोकप्रतिनिधी तसेच जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. आदिवासी विकास विभागाकडून २०१७-१८ मध्ये आदिवासी विकास आराखड्यात न्युक्लिअस बजेट अंतर्गत आदिवासी बांबू कारागिरांना अनुदान देण्याची तरतुद करावी, अशी मागणी आहे. बांबू कारागिरांना शासनाकडून अनुदान मिळाले तर स्वयंरोजगार करण्यासाठी सहायक ठरणार आहे.
आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त यांनी या मागणीची दखल घेत न्यूक्लीअस बजेट अंतर्गत बांबू कारागिरांना प्रति लाभार्थी ५० हजार रुपये अनुदान देण्याची तरतुद करावी, अशी मागणी आहे. प्रशिक्षण घेतलेले ५० कारागीर तसेच प्रशिक्षणाकरिता निवड झालेले अशा शंभर लाभार्थ्यांकरिता योजना मंजूर करण्याची मागणी होत आहे. या माध्यमातून बांबू कारागिरांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटेल.
निवेदन देताना भाजप नगरसेविका रेणुका आडे, शरद आडे, छाया उईके, जया मसराम, सिंधु सिडाम, वर्षा इरपाये, शिला मसराम, वर्षा आडे, अंजु मडावी, मंजु कोहचडे, कावेरी वलके, ममता पेंदाम, लता परतेकी, राममल्ली कोडापे, उषा कोडापे, बेबी आत्राम, मेघा आडे, नंदा कुरसंगे, विमला परतेकी, गायत्री आडे आदींची उपस्थिते होती.