वृक्षारोपणासह संगोपनाला महत्त्व द्या
By Admin | Published: May 31, 2017 12:41 AM2017-05-31T00:41:35+5:302017-05-31T00:41:35+5:30
५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात यंदा ९ लाख वृक्ष लावण्यात येत आहेत.
शैलेश नवाल : यंदाच्या पावसाळ्यात नऊ लाख रोपटी लावणार
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : ५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात यंदा ९ लाख वृक्ष लावण्यात येत आहेत. या वृक्षांच्या रोपणासह त्यांच्या संगोपणाची जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे. जिल्ह्यात वृक्षलागवड कमी झाली तरी चालेल; पण लावण्यात आलेले वृक्ष जगविण्यासाठी नागरिकांसह स्वयंसेवी संस्थांनी प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेतून केले.
जिल्हाधिकारी नवाल पुढे म्हणाले, ४ जूनला वर्धा शहरात वृक्षलागवडीसाठी महाश्रमदान होणार आहे. यात नागरिकांसह स्वयंसेवी संस्था सहभागी होणार आहेत. गत वर्षी लावण्यात आलेले ९३ टक्के वृक्ष वनविभागाने नागरिकांच्या सहकार्याने जगविले आहे. इतर विभागाची टक्केवारी ७७ आहे. यंदा वृक्ष लागवडी सोबतच चारा लागवड करून शिवार हिरवे ठेवण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना विशेष सहकार्यही मिळणार आहे. शासकीय व महसूल विभागाच्या जमिनीवर वृक्षारोपण करून ते जगविण्याची इच्छा असणाऱ्यांना शासकीय जागेवर विंधन विहीर व संरक्षण भिंत तसेच कुंपण तयार करून दिले जाणार आहे. याकरिता आतापर्यंत ८ ते ९ जणांचे आवेदन प्राप्त झाले आहेत. या उपक्रमात ग्रीन आर्मीच्या ३२ हजार सदस्यांचेही सहकार्य घेतले जाईल, असे त्यांनी सांगितले.
ग्रीन वर्धा करण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन हनुमान टेकडीवर व कमळ तलाव परिसरात १५ हजार वृक्ष, पुलगाव सिएडी कॅम्प परिसरात २० हजार वृक्ष लावण्याचे नियोजन आहे. नदी, नाला, तलाव असलेल्या एकूण २५० कि.मी.च्या भागात २ लाख बांबुचे वृक्ष लावण्यात येत आहे. केवळ खड्डे खोदून वृक्ष लावले, असे न होऊ देता नागरिकांसह सामाजिक संघटनांनी व शासकीय विभागाने प्रत्यक्षात वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे. जिल्ह्यात झाडांसह चारायुक्त शिवार तयार करावयाचा आहे. वृक्षारोप कमी झाले तरी चालेल; पण लावलेले प्रत्येक झाड जगविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे, असे जिल्हाधिकारी नवाल म्हणाले. या पत्रपरिषदेला उपवनसंरक्षक दिगंबर पगार, पोलीस उपअधीक्षक (गृह) रवींद्र किल्लेकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा साबळे, निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे, पिपल्स फॉर अॅनिमल्सचे आशीष गोस्वामी आदींची उपस्थिती होती.