वैकल्पिक वाद निवारण कक्षातून जनतेला न्याय द्या
By Admin | Published: January 18, 2016 02:16 AM2016-01-18T02:16:27+5:302016-01-18T02:16:27+5:30
वैकल्पिक वाद निवारण कक्षातून (न्याय सेवा सदन) अधिकाधिक दावे, प्रकरणे निकाली काढण्यास मदतच होणार आहे.
वासंती नाईक : न्याय सेवा सदन नवीन इमारतीचे उद्घाटन
वर्धा : वैकल्पिक वाद निवारण कक्षातून (न्याय सेवा सदन) अधिकाधिक दावे, प्रकरणे निकाली काढण्यास मदतच होणार आहे. नवीन न्याय सेवा सदन या वास्तूच्या माध्यमातून या कार्याला अधिक गती मिळेल, असे प्रतिपादन नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती तथा वर्धा जिल्हा पालक न्यायमूर्ती वासंती नाईक यांनी केले.
जिल्हा न्यायालय परिसरात न्याय सेवा सदन नवीन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संध्या द्वा. रायकर होत्या. तर व्यासपीठावर अधिवक्ता संघाचे अध्यक्ष प्र. म. देशपांडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव सु.ना. राजूरकर यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संध्या रायकर यांनी वर्धा जिल्ह्यातील न्याय सेवेचे महत्त्व विषद केले. यामध्ये त्यांनी स्वांतत्र्यपूर्व काळापासून ते आजपर्यंत अविरतपणे न्यायदानाचे कार्य सुरू असल्याचे सांगून जिल्ह्यातील ऐतिहासीक महत्त्वही विषद केले. लोकन्यायालय, विधी सेवा प्राधिकरण, मध्यस्थी केंद्रांच्या माध्यमातून अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली, असे यावेळी सांगितले.
प्रारंभी मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन झाले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. नवीन इमारतीच्या कोनशीलेचे अनावरण न्यायमूर्ती नाईक यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी संपूर्ण वास्तूची पाहणी केली. स्वागत गीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केले.
यावेळी जिल्हा सत्र न्यायाधीश चांदेकर, कोटंबकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा सरकारी अभियोक्ता अनुराधा सबाने, जिल्हा पोलीस उपअधीक्षक आर.जी. किल्लेकर, अभियंता गुज्जेवार, विधी सेवा प्राधिकरणाचे सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, पुलगाव, समुद्रपूर विधीज्ञ सेवा मंडळाचे पदाधिकारी, न्यायालयीन अधिकारी, उपस्थित होते. संचालन न्यायाधीश देशपांडे यांनी केले तर आभार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव सु.ना. राजूरकर यांनी मानले. (प्रतिनिधी)
वैकल्पिक न्याय निवारण ही संकल्पना प्राचीनच
वैकल्पिक न्याय निवारण ही संकल्पना पूर्व काळापासून चालू असून तिला आता व्यापक स्वरूप प्राप्त झालेले आहे. या नवीन इमारतीतून अधिकाधिक प्रकरणे निकाली काढण्यासाठी यंत्रणा सज्ज झालेली आहे. वैकल्पिक वाद निवारण कक्षातून आपसी तडजोडीने मिटणारी प्रकरणे, प्रलंबित प्रकरणे ही निकाली निघतील. न्यायालयीन प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यासाठी दावेदार, प्रतिवादी यांना मध्यस्थांमार्फत त्यांचे महत्त्व पटवून दिल्यास तेही प्रकरणे सामंजस्याने मिटविण्यासाठी पुढे येतात, असे सांगून त्यांनी वैकल्पिक वाद निवारण कक्ष, कक्षाची संकल्पना, प्रक्रिया, मध्यस्थाची भूमिका आदी विषयांवर सविस्तर मांडणी करून प्रत्येक व्यक्तीला वेळेत न्याय सेवा मिळेल, असा विश्वास न्यायमूर्ती नाईक यांनी व्यक्त केला.