आगामी निवडणुकांत नव्या चेहऱ्यांसह तरुणांना संधी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2022 05:00 AM2022-07-17T05:00:00+5:302022-07-17T05:00:07+5:30
पक्षाचे अनेक चांगले कार्यकर्ते इथे आपले भवितव्य नाही, म्हणून पक्षापासून दूर झाले. त्याचा परिणाम म्हणून एकेकाळी सत्तेत असणारा राष्ट्रवादी पक्ष सत्तेबाहेर फेकला गेला आहे. आता जि.प., पं.स., न.प.ची निवडणूक होणार असून पुन्हा निवडणुकीत उमेदवारीवर आपला हक्क सांगू लागल्यामुळे तरुण व नवीन कार्यकर्त्यांत गोंधळाची स्थिती आहे, असे या बैठकीदरम्यान सांगण्यात आले. या बैठकीत रा.काँ.चे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचीही माहिती जाणून घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पक्षाला नवसंजीवनी द्यायची असेल तर आगामी सर्व निवडणुकांत नवीन चेहऱ्यांसह तरुणांना संधी द्यावी, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी वर्धा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना दिला.
रा.काँ.चे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे नागपूर दौऱ्यावर आले असता वर्धा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. यावेळी माजी आमदार सुरेश देशमुख, माजी मंत्री सुबोध मोहिते, राकाँचे जिल्हा अध्यक्ष सुनील राऊत, ॲड. सुधीर कोठारी, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. दिवाकर गमे, सरचिटणिस किशोर माथनकर, अल्पसंख्याक सेलचे प्रा. खतिब, युवक काॅंग्रेसचे संदीप किटे, राजेंद्र डागा, चेनकरण कोचर, राजाभाऊ टाकसळे, मिलिंद हिवलेकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. बैठकीदरम्यान जिल्ह्याच्या राजकीय वाटचालीबाबत चर्चा करण्यात आली.
वर्धा जिल्ह्यात चुकीच्या धोरणांमुळे पक्षाचे अस्तित्व संपण्याच्या मार्गावर आलेले आहे. त्यातही एकमेव हिंगणघाट विधानसभा मतदार संघ हा आघाडीमध्ये राष्ट्रवादीकडे होता; पण केवळ जातिवादाच्या समीकरणातून २००४ पासून केवळ एकाच व्यक्तीला पक्षाने उमेदवारी दिल्यामुळे गत तिन्ही निवडणुकांत पक्षाला पराभूत होऊन अमानतही वाचविता आली नाही, अशी अवस्था झाली आहे. अत्यंत अल्पसंख्याक असलेल्या भाजपच्या उमेदवारांनी लाखभर मते घेऊन बाजी मारली. तर पाच वर्षांपूर्वी झालेल्या हिंगणघाटच्या सार्वत्रिक नगराध्यक्षाच्या निवडणुकीतही तेच ते जुने चेहरे दिल्यामुळे तिथेही रा.काँ.च्या उमेदवारावर निवडून यायचे सोडा, अमानत जप्त होण्याची नामुष्की आली. यापासून कुठलाही बोध न घेता वर्षानुवर्षे हिच मंडळी राष्ट्रवादी पक्ष म्हणजे आपली मालमत्ता समजून पुन्हा पुन्हा प्रत्येक निवडणुकीत आपला आणि आपल्या गोतावळ्यांचा हक्क सांगत होती. त्यामुळे पक्षाचे अनेक चांगले कार्यकर्ते इथे आपले भवितव्य नाही, म्हणून पक्षापासून दूर झाले. त्याचा परिणाम म्हणून एकेकाळी सत्तेत असणारा राष्ट्रवादी पक्ष सत्तेबाहेर फेकला गेला आहे. आता जि.प., पं.स., न.प.ची निवडणूक होणार असून पुन्हा निवडणुकीत उमेदवारीवर आपला हक्क सांगू लागल्यामुळे तरुण व नवीन कार्यकर्त्यांत गोंधळाची स्थिती आहे, असे या बैठकीदरम्यान सांगण्यात आले. या बैठकीत रा.काँ.चे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचीही माहिती जाणून घेतली. नुकसानीचा अंतिम अहवाल पक्षाकडे पाठवावा, अशा सूचनाही शरद पवार यांनी शिष्टमंडळातील पुढाऱ्यांना दिल्या.
सुपूत्रासह माजी आमदार तिमांडे भेटले पवारांना
- हिंगणघाटचे माजी आमदार राजू तिमांडे यांनी शरद पवार यांची गिरीष गांधी यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांच्या समावेत साैरभ तिमांडे, प्रदीप डगवार, राजू उमरे, गाैरव तिमांडे, निखिल वदनलवार, शकील अहेमद, युवराज माऊसकर उपस्थित होते.