शहरातील पट्ट्यांचे मालकी हक्क तातडीने द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 10:06 PM2019-07-19T22:06:10+5:302019-07-19T22:06:39+5:30
शहरातील रामनगरसह अनेक भूखंडाचा प्रश्न अद्यापही प्रलंबित असल्याने तेथील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यासंदर्भात तातडीने पावले उचलण्यात यावी. रामनगरसह शहरातील पट्टयांचे मालकी हक्काने तातडीने वाटप करण्यात यावे, असे निर्देश आमदार डॉ पंकज भोयर यांनी जिल्हाधिकारी यांना दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरातील रामनगरसह अनेक भूखंडाचा प्रश्न अद्यापही प्रलंबित असल्याने तेथील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यासंदर्भात तातडीने पावले उचलण्यात यावी. रामनगरसह शहरातील पट्टयांचे मालकी हक्काने तातडीने वाटप करण्यात यावे, असे निर्देश आमदार डॉ पंकज भोयर यांनी जिल्हाधिकारी यांना दिले. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी समितीचे गठन केले आहे.
वर्धा शहरातील रामनगर येथील लीज धारकांना मालकी हक्क, साने गुरुजी नगर, नगर परिषद कर्मचारी वसाहत येथील भूखंड नियमाकुल करणे , मुख्य बाजारपेठेतील शीट क्रमांक १६ मधील भूखंड नियमाकुल करून मालकी हक्क देणे, गजानन नगर येथील भूखंड नियमाकुल करणे, जाकीर हुसेन कॉलोनी, अशोक नगर, आनंद नगर,फुलफैल येथील रहिवासी यांना भूखंडाचे पट्टे वितरीत करणे संदर्भात जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांच्या कक्षात गुरूवारला बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार डॉ पंकज भोयर, नगराध्यक्ष अतुल तराळे, उपाध्यक्ष प्रदीपसिंग ठाकूर, मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे , नगर सेवक निलेश किटे, नौशाद शेख, अरविंद कोपरे, कैलास राखडे, राखी पांडे, अभिषेक त्रिवेदी, जयंत सालोडकर, उषा देवढे , तहसीलदार प्रीती डूडूलकर, नायब तहसीलदार शकुंतला पराजे, तालुका भूमी अभिलेख अधिकारी भुजाडे, ठाकरे, व्यापारी वर्गाचे प्रतिनिधी म्हणून भालचंद्र कठाळे, योगेंद्र फत्तेपुरीया, ताराचंद चौबे, मिलन गांधी आदी उपस्थित होते.आमदार डॉ पंकज भोयर यांनी हा प्रश्न गंभीर स्वरूपाचा असून तो तातडीने निकाली काढणे आवश्यक असल्याचे सांगत प्रशासकीय पातळीवर तातडीने उपाययोजना करून हा प्रश्न मार्गी लावण्याची सूचना केली. जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी त्वरित समिती गठीत करण्याचे आश्वासन दिले.
त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.समिती मध्ये तहसीलदार, न प मुख्याधिकारी, उपअधीक्षक भूमिअभिलेख, दुय्यम निबंधक यांचा समावेश आहे. समितीने तातडीने याबाबत कार्यवाही करून अहवाल सादर करावा, असे आदेश भिमनवार यांनी दिले. दरम्यान शहरातील नागरिक जमिनीचे पट्टे मिळावे यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. त्यांची दखल आमदारांनी घेत जिल्हाधिकारी यांना लक्ष घालण्यास सांगितले.
लीज,भूखंडाचे मालकी हक्क तसेच ज्या नागरिकांची भूखंड विषयक प्रकरणे प्रलंबित आहे त्यांनी आपल्याशी संपर्क करावा.
डॉ पंकज भोयर, आमदार