नाफेडने खरेदी केलेल्या तूरीचे चुकारे द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 12:31 AM2018-10-04T00:31:04+5:302018-10-04T00:32:49+5:30
खासगी व्यापाऱ्यांपेक्षा थोडा जास्त दर नाफेडच्यावतीने तूर उत्पादकांना दिल्या जात असल्याने सेलू तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्याजवळील तूर नाफेडला विकली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : खासगी व्यापाऱ्यांपेक्षा थोडा जास्त दर नाफेडच्यावतीने तूर उत्पादकांना दिल्या जात असल्याने सेलू तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्याजवळील तूर नाफेडला विकली. परंतु, तालुक्यातील सुमारे २०० शेतकऱ्यांना नाफेडने तूरीचे चुकारे न दिल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षासमोर ठिय्या दिला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय दैने यांच्याशी झालेल्या सकारात्मक चर्चेअंती आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.
सिंदी कृषी उत्पन्न बाजार समिती व उपबाजार समिती सेलू येथे विदर्भ को. आॅप. मार्केटींग फेडरेशनच्या नागपूर शाखेने वर्धा शाखेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडील तूर खरेदी केली. शेतकऱ्यांची तूर खरेदी करताना तूरीला प्रती क्विंटल ५ हजार ४५० रुपये दर देण्यात आला. त्याबाबतची हिशोब पट्टी, सौदापट्टी व काटापट्टी शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. खरेदी केलेल्या तूरीचे चुकारे सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना देणे क्रमप्राप्त होते. परंतु, सुमारे सहा महिन्यांचा कालावधी लोटूनही सदर रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. तूर उत्पादक शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता या प्रकरणी संबंधितांना बोलावून शेतकऱ्यांना दिलासा देत तूरचे पैसे मिळवून देण्यात यावे, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी रेटून लावली. काळीवेळ आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या दिल्यानंतर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसह आंदोलनाचे नेतृत्त्व करणाऱ्यांना चर्चेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बोलावण्यात आले. यावेळी झालेल्या सकारात्मक चर्चेअंती आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले. आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी संजय दैने यांना सादर करण्यात आले. आंदोलनात रामनारायण पाठक, मारोती बेले, सुनील गुळघाणे, प्रमोद चाफले, नारायण महाकाळकर, गोपाळ झाडे, प्रमोद तडस, देवराव चाफले, कार्तीक झाडे यांच्यासह सेलू तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.