तरूणांनो समाजसेवा व देशसेवेला प्राधान्य द्या!

By admin | Published: January 6, 2017 01:34 AM2017-01-06T01:34:38+5:302017-01-06T01:34:38+5:30

कोणताही देश केवळ समृद्ध व्यापार, उंच इमारती, चांगल्या दर्जाची रहदारी व्यवस्था, सैन्यदलाची शस्त्रे यावर

Give priority to social service and country service! | तरूणांनो समाजसेवा व देशसेवेला प्राधान्य द्या!

तरूणांनो समाजसेवा व देशसेवेला प्राधान्य द्या!

Next

एस.एन. सुब्बाराव : राष्ट्रीय छात्र सेनेचा वर्धापन दिन कार्यक्रम
देवळी : कोणताही देश केवळ समृद्ध व्यापार, उंच इमारती, चांगल्या दर्जाची रहदारी व्यवस्था, सैन्यदलाची शस्त्रे यावर बलशाही बनण्याचे स्वप्न पाहू शकत नाही. तर त्या देशातील युवा कितपत जागृत, समर्पित आहे यावर त्या राष्ट्राची शक्ती व प्रगती ठरते. या दृष्टीकोनातून युवापिढीला योग्य वेळी योग्य प्रशिक्षण व मार्गदर्शनाची गरज आहे. तरुणांनी एन.सी.सी., स्काऊटस आणि गाईड्स, राष्ट्रीय युवा योजना यात सहभागी होऊन समाजसेवा व देशसेवेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन ज्येष्ठ गांधी विचारक तथा राष्ट्रीय युवा योजनेचे संचालक डॉ. एस.एन. सुब्बाराव यांनी केले.
स्थानिक एस.एस.एन.जे. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना विभागातर्फे एन.सी.सी. चा वर्धापन दिन कार्यक्रम बुधवारी घेण्यात आला. यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा.रामदास तडस होते. याप्रसंगी २१ महाराष्ट्र एन.सी.सी. बटालियनचे प्रशासकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल राजेंद्र सिंह, नगर परिषद उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक संजय माटे, स्काऊटचे राज्य मुख्यालय आयुक्त आर. जयस्वाल, निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे, आशिष गोस्वामी, प्राचार्य डॉ. सुरेश उपाध्याय, कॅप्टन प्रा.मोहन गुजरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यानंतर बोलताना खा. तडस म्हणाले देशभक्ती व आदर्श नागरिक घडविण्यात एन.सी.सी.ने महत्त्वाची भूमिका बजावत आहे. खासदार निधीतून एन.सी.सी. भवन निर्मितीला निधी देण्याचे त्यांनी जाहीर केले. या महाविद्यालयाच्या २० छात्र सैनिकांना दिल्ली येथील राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाला स्वखर्चाने नेण्याचे खा. तडस यांनी सांगितले.
यावेळी लेफ्टनंट कर्नल राजेंद्र सिंह यांनी एन.सी.सी. कॅडेटस्ना सेनादलात उपलब्ध असलेल्या संधीबाबत सांगून सैन्यदलात अधिकारी बना, असे आवाहन केले. तर प्राचार्य डॉ. सुरेश उपाध्यक्ष यांनी एन.सी.सी. कॅडेटस्चे कौतुक केले. कॅप्टन प्रा. मोहन गुजरकर यांनी प्रास्ताविक भाषणातून राष्ट्रीय छात्र सेनेचा इतिहास व महाविद्यालयाने केलेल्या प्रगतीचा आढावा सांगितला.
कार्यक्रमाचा पथसंचालनाने प्रारंभ करण्यात आला. खा. तडस यांनी परेडचे निरीक्षण केले. अंडर आॅफिसर आशिष परचाके याला बेस्ट कॅडेट्सचे चषक तर दिनेश साळूंखे याला शौर्य पुरस्कार देवून सन्मानित केले. परेडचे नेतृत्व अंडर आॅफिसर आशिष परचाके पुजा गिरडकर, सार्जेंट स्वप्नील शिंगाडे यांनी केले. रोव्हर पथकाचे नेतृत्व धिरज कामडी, रेंजर पथकाचे नेतृत्व सपना बनसोड हिने केले. यानंतर ‘हम भारत की संतान’ ही नृत्य-नाटिका सादर करण्यात आली. नवनिर्वाचित न.प. उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर यांना सन्मानित केले. संचालन अश्विनी घोडखांदे हिने तर आभार संतोष तुरक यांनी मानले.(प्रतिनिधी)

पथसंचलन करताना छात्रसैनिक. यावेळी उपस्थित खा. रामदास तडस आणि प्रा. मोहन गुजरकर. तसेच नाटिका सादर करताना चमू.

Web Title: Give priority to social service and country service!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.