सेवाग्राम आश्रमाला वारसास्थळाचा दर्जा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 09:52 PM2019-04-17T21:52:25+5:302019-04-17T21:52:57+5:30
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने जागतिक आकर्षणाचे केंद्र ठरले. तसेच जगाला अहिंसा व शांतीचा संदेश देणारे ऐतिहासिक स्थळ आहे. आज १८ एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून जगभरात साजरा केला जात असून महात्म्य जपण्याकरिता सेवाग्राम आश्रमाचा समावेश जागतिक वारसास्थळात करण्यात यावा, अशी मागणी बहार नेचर फाऊंडेशनने केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने जागतिक आकर्षणाचे केंद्र ठरले. तसेच जगाला अहिंसा व शांतीचा संदेश देणारे ऐतिहासिक स्थळ आहे. आज १८ एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून जगभरात साजरा केला जात असून महात्म्य जपण्याकरिता सेवाग्राम आश्रमाचा समावेश जागतिक वारसास्थळात करण्यात यावा, अशी मागणी बहार नेचर फाऊंडेशनने केली आहे.
महात्मा गांधींनी १९३४ मध्ये सेवाग्राम आश्रमाची स्थापना केली व त्यानंतर हा आश्रम भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे केंद्रस्थान झाले. भारतीय स्वातंत्र्य चळवळ व्यापक करणाऱ्या अनेक घडामोडी या आश्रमात घडल्या. पायाभूत शिक्षणासह पर्यावरणपूरक जीवनशैलीला अनुरूप अनेक विधायक उपक्रम महात्मा गांधींनी येथे राबविले. आज अवघे विश्व हिंसेच्या शक्यतेने भयग्रस्त झाले असून मानवी लालसेपायी निसर्गही धोक्यात आला आहे. अशा विपरित परिस्थितीत गांधींच्या विचारांची साºया जगाला आज नितांत गरज आहे. हा विचार अवघ्या जगाला आपल्या कृतीने आणि प्रयोगांनी समजावून सांगणारी सेवाग्राम आश्रम ही एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक भूमी असून त्याचे शाश्वत मूल्य लक्षात घेऊन या स्थळाला जागतिक वारसास्थळाचा दर्जा बहाल करण्यात यावा, यासाठी बहार नेचर फाउंडेशनच्यावतीने केंद्र सरकारशी पत्रव्यवहारही करण्यात आला आहे. युनेस्कोकडून १९७२ मध्ये घेतलेल्या ठरावानुसार सांस्कृतिक अथवा नैसर्गिक वारसास्थळांचा समावेश या यादीत केल्या जातो. जागतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण स्थानांतर्गत प्राचीन वास्तू, ऐतिहासिक ठिकाणे, जंगल, उद्यान, सरोवर आदींचा समावेश त्यात करण्यात येतो.
भारतातील ३७ स्थळांचा समावेश आतापर्यंत या यादीत करण्यात आलेला आहे. वारसा स्थळाचे संरक्षण व संवर्धन करणे तसेच पुढील पिढ्यांपर्यंत हा अमूल्य वारसा सुपूर्द करणे हा उद्देश वारसास्थळ घोषित करण्यामागे आहे. सेवाग्राम आश्रमाचा समावेश जागतिक वारसा स्थळात करण्यासाठीची शिफारस भारत सरकारने युनेस्कोकडे करावी व तसा प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी बहार नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. किशोर वानखडे, सचिव दिलीप विरखडे, संजय इंगळे तिगावकर, अतुल शर्मा, राहुल तेलरांधे, जयंत सबाने, वैभव देशमुख, दीपक गुढेकर, राहुल वकारे, अविनाश भोळे, राजदीप राठोड, सुनंदा वानखडे यांनी केली आहे.