शेतातील पिकांसाठी एकतरी पाणी द्या हो...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 10:18 PM2018-11-15T22:18:07+5:302018-11-15T22:19:58+5:30
दरवर्षी रब्बीसाठी महाकाळी धरणाचे पाणी नदी व कालव्याद्वारे सिंचनासाठी सोडल्या जाते. परंतु या वर्षी अल्पवृष्टीमुळे धरणासाठी फक्त ३७ टक्के पाणीसाठा असल्यामुळे कालव्याला पाणी सोडणार नसल्याचे परिपत्रक पाटबंधारे विभागाने ११ नोव्हेंबरला काढले असल्याने कालवा क्षेत्रातील शेतकऱ्यांवर बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनार : दरवर्षी रब्बीसाठी महाकाळी धरणाचे पाणी नदी व कालव्याद्वारे सिंचनासाठी सोडल्या जाते. परंतु या वर्षी अल्पवृष्टीमुळे धरणासाठी फक्त ३७ टक्के पाणीसाठा असल्यामुळे कालव्याला पाणी सोडणार नसल्याचे परिपत्रक पाटबंधारे विभागाने ११ नोव्हेंबरला काढले असल्याने कालवा क्षेत्रातील शेतकऱ्यांवर बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. दुष्काळी परिस्थितीमुळे कोरडवाहू क्षेत्रातील कपाशीची उलंगवाडी होण्याची स्थिती आहे. पाण्याअभावी तुरही कोमजू लागली आहे. तुरीला पाणी जरी मिळाले तरी उत्पन्नात भर पडू शकते. बोर धरणातही अत्यल्प साठा आहे. परंतु त्या धरणाचे दोन पाणी कालव्याद्वारे देण्यात येत आहे. धामचे पाणी पिण्यासाठी संरक्षीत असले तरी त्यातून औद्योगिकरणासाठी धाम नदीद्वारे पाणी सोडण्यात येते. त्यामुळे रेल्वे व सेवाग्राम एमआयडीसी उत्तम गालवा याला नियमित पाणीपुरवठा केला जातो. धरणाचा उद्देश हा पिण्याचे पाणी व सिंचन याला प्राथमिकतेने पाणी देण्यासाठी होता. येथे मात्र सिंचनाला पूर्णत: बगल दिली जात आहे. येळाकेळी ते तरोडा या क्षेत्रातील हजारो हेक्टर रब्बीचे क्षेत्र हे कालव्यावर अवलंबून आहे. परंतु काढलेल्या परिपत्रकामध्ये कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येणार नसल्याचा स्पष्ट उल्लेख असून ३१ डिसेबरनंतर नदीवर लिफ्ट इरीगेशनला सुध्दा मनाई करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीवरील पाणी घेणाºयांची ऊस, केळीची पिकेही धोक्यात आली आहे. एक तरी पाणी द्या अशी विनवणी शेतकरी करीत आहे.
नदीचे गाव अडचणीत
धाम नदीच्या काठावरील पवनार गावात बाराही महिने पाणी राहत होते. शिवाय शेतीलाही कॅनलदारे पाणी दिले जात होते. यंदा मात्र परिस्थिती विपरीत आहे. खरीपात एका पाण्यासाठी शेतकरी प्रशासनाला अर्ज विनंती करीत आहे. मात्र पाणी देण्याबाबत निर्णय झालेला नाही.