सेवाग्राम आश्रमाला जागतिक वारसास्थळाचा दर्जा द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 08:27 PM2019-05-21T20:27:58+5:302019-05-21T20:28:29+5:30
सेवाग्राम आश्रमाला जागतिक वारसास्थळाचा दर्जा बहाल करण्यात यावा, अशी मागणी बहार नेचर फाऊंडेशनने केली असून आम्ही या मागणीचा पाठपुरावा करू, अशी भूमिका महाराष्ट्र वारसा जतन आणि संवर्धन परिक्रमेचे संयोजक बंडू धोत्रे यांनी व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा - महात्मा गांधींच्या वास्तव्याने पावन झालेला सेवाग्राम आश्रम जगाला अहिंसा व शांतीचा संदेश देतो, शिवाय प्रचंड वेगाने मानवाकडून होणारा निसर्गाचा ऱ्हास थांबवायचा असेल तर पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारण्याची गरज निर्माण झालेली आहे, हा जागतिकदृष्ट्या महत्त्वाचा संदेशही सेवाग्राम आश्रम देतो. म्हणूनच सेवाग्राम आश्रमाला जागतिक वारसास्थळाचा दर्जा बहाल करण्यात यावा, अशी मागणी बहार नेचर फाऊंडेशनने केली असून आम्ही इको-प्रोद्वारे या मागणीचा पाठपुरावा करू, अशी भूमिका महाराष्ट्र वारसा जतन आणि संवर्धन परिक्रमेचे संयोजक बंडू धोत्रे यांनी सेवाग्राम आश्रमाच्या भेटीप्रसंगी व्यक्त केली.
इको-प्रो, चंद्रपूर या संस्थेद्वारे १ मेपासून राज्यात महाराष्ट्र वारसा जतन आणि संवर्धन परिक्रमा आयोजित केली होती. या परिक्रमेचा समारोप सेवाग्राम आश्रमात करण्यात आला. तत्पूर्वी या यात्रेचे स्वागत ऐतिहासिक वास्तू असलेल्या मगन संग्रहालयातील कुमारप्पा भवनात करण्यात आले. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉ. विभा गुप्ता होत्या. यावेळी, जिल्ह्याचे उपवनसंरक्षक डॉ. सुनील शर्मा, मानद वन्यजीव रक्षक संजय इंगळे तिगावकर, बहार नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. किशोर वानखडे, इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष तथा चंद्रपूरचे मानद वन्यजीव रक्षक बंडू धोत्रे यांची प्रमुख उपस्थित होती. साडेचार हजार किलोमीटरची मोटरसायकलवर परिक्रमा करीत राज्यातील अनेक गड-किल्ले, परकोट, ऐतिहासिक वास्तू आणि अभयारण्यांना भेट देत 'आपला वारसा आपणच जपूया' हा संदेश या यात्रेने दिला.
ऐतिहासिक वास्तू या भूतकाळ आणि भविष्याशी नाते सांगतात. आपला वारसा आपणच जपावयास पाहिजे, असे मनोगत बंडू धोत्रे यांनी केले. ते पुढे म्हणाले, संबंधित सरकारी विभागांकडे पैसा आहे पण इच्छाशक्ती नाही. गड-किल्ल्यांच्या संवर्धन संदर्भात धोरणांचा अभाव आहे. म्हणूनच जय भवानी, जय शिवाजीच्या पुढे जाऊन हा वारसा जतन करण्याची गरज आहे. शासन उदासीन असून आपणच पुढे आले पाहिजे, असेही धोत्रे म्हणाले.
कार्यक्रमाचे संचालन दीपक गुढेकर यांनी केले तर आभार अविनाश भोळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता बहार नेचर फाउंडेशनचे सचिव दिलीप वीरखडे, राहुल तेलरांधे, दर्शन दुधाने, पवन दरणे, राजेंद्र लांबट, राहुल वकारे यांनी परिश्रम घेतले. सेवाग्राम आश्रमाला भेट देऊन या परिक्रमेचा समारोप करीत ही यात्रा चंद्रपूरला रवाना झाली