आमदारांचा असाही अट्टाहास; म्हणे, हाच कंत्राटदार माझा खास; सोशल मीडियावर पत्र होतयं व्हायरल
By आनंद इंगोले | Published: March 28, 2023 10:50 AM2023-03-28T10:50:50+5:302023-03-28T10:55:18+5:30
कंत्राट देण्यासाठी चक्क बीडीओंना पत्र
वर्धा : गावाच्या विकासाकरिता शासन स्तरावरून निधी खेचून आणणे हे लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे. आमदार निधी कोणत्या कामावर खर्च करायचा, हा त्यांचा अधिकार आहे. परंतु विकास निधीतून होणारी कामे माझ्याच कंत्राटदाराला द्यावीत, असा अट्टाहास एका आमदारांनी धरल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्या आमदारांनी चक्क मतदारसंघातील गटविकास अधिकाऱ्यांना पत्र पाठवून त्यावर कंत्राटदाराची नावे व कामे नमूद केली आहेत. त्यामुळे ‘दादासाहेब’ आता हे अति होतेय, अशा प्रतिक्रियाही व्यक्त व्हायला लागल्या आहेत.
‘घर फिरलं की वासेही फिरतात’ अशी गावगाड्यातील म्हण आहे. त्यामुळे परिस्थितीनुसार पायाखालची वाळू सरकायला लागली की, मन:स्थितीही विचलित होते आणि आपले निर्णयही चुकायला लागतात. याचाच फायदा घेत जवळचेच चुकीचा मार्ग दाखवून ‘मोडक्या कुपावर पाय देण्याचा प्रयत्न करतात’. असाच काहीसा प्रकार आर्वी विधानसभा क्षेत्रातील आमदारांसोबत तर घडत नाही ना? असं काही प्रकारावरून दिसतं. पण, हे योग्य नाही. सध्या हे आमदार महोदय पत्राचारामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांनी आपल्या लेटर हेडवर मतदारसंघातील सर्व पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांच्या नावे पत्रे पाठविली. त्या पत्रांवर चक्क कंत्राटदाराचे नाव आणि कामाचे नाव नमूद करून त्यांनाच कामे द्यावीत, असा आग्रह धरला आहे. त्यामुळे एका आमदारांनी अशा प्रकारे पत्र पाठविणे हा पहिलाच प्रकार असल्याने अधिकारीही थक्क झालेत. आता हे पत्र सोशल मीडियाद्वारे व्हायरल झाल्याने इतर कंत्राटदारांमध्येही रोष व्यक्त होत आहे. विशेषत: पत्रावर नमूद असलेले कंत्राटदार त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते असल्याने हे कितपत योग्य, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ग्रामपंचायतच्या कामातही लुडबुड
आमदारांनी दिलेल्या पत्रामध्ये जिल्हा वार्षिक योजना अ, क, ड अंतर्गत, आर्वी विधानसभेतील मंजूर असलेली कामे, जिल्हा नियोजन समिती ग्रामपंचायत भवन व जनसुविधांच्या कामांचा समावेश आहे. आमदारांनी आता ग्रामपंचायतींच्या कामांमध्येही लुडबुड चालविल्याने सरपंचांकडूनही रोष व्यक्त होत आहे. परंतु आमदारांना या कामांमध्ये इतका ‘इन्ट्रेस’ का, हाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांवर दबावतंत्र
आर्वी विधानसभा क्षेत्राच्या आमदारांसह त्यांच्याच पक्षातील काही जिल्हा परिषदेच्या माजी पदाधिकाऱ्यांकडून अधिकाऱ्यांवर रोख झाडला जात आहे. विशेषत: बरेच माजी पदाधिकारी किंवा त्यांचे पतीदेव हेच स्वत: कंत्राटदार असल्याने सत्तेचा गैरफायदा घेत आहेत. स्वीय साहाय्यकही साहेबांच्या नावाने मिनी मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर रुबाब झाडत आहेत. या दबावतंत्रामुळे अधिकाऱ्यांचीही मन:स्थिती खालावत असून, तणावात काम करावे लागत आहे.
आमची सत्ता असून आमच्या कार्यकर्त्यांना कामे मिळाली पाहिजेत. कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आता पूर्ण नाही करणार तर कधी? काँग्रेसचे कार्यकर्ते बिलोमध्ये निविदा भरतात. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना कामे मिळत नाहीत. आणि ते कामही बोगस होते. म्हणून गटविकास अधिकाऱ्यांना पत्र देऊन कामे देण्यास सांगितले आहे.
- दादाराव केचे, आमदार आर्वी