अवैध बांधकामांवर गंडांतर
By admin | Published: July 22, 2016 01:49 AM2016-07-22T01:49:21+5:302016-07-22T01:49:21+5:30
बोरगाव (मेघे) ग्रा.पं. च्या हद्दीत अवैध बांधकमांचा सपाटाच सुुरू आहे. ग्रामपंचायत व अधिकाऱ्यांना न जुमानता स्वमर्जीने होत असलेल्या
प्रपत्राद्वारे शासनाची दिशाभूल : बोरगाव ग्रा.पं. हद्दीत बांधकामांचा सपाटा
वर्धा : बोरगाव (मेघे) ग्रा.पं. च्या हद्दीत अवैध बांधकमांचा सपाटाच सुुरू आहे. ग्रामपंचायत व अधिकाऱ्यांना न जुमानता स्वमर्जीने होत असलेल्या घरांच्या बांधकामावर गजराज चालणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी, सरपंचांनी स्पष्ट केले. बांधकाम करीत असलेल्या नागरिकांनी खुलाशातून शासनाचीच दिशाभूल केल्याचेही उघड झाले आहे. यामुळे सर्वच अवैध बांधकामांवर गंडांतर येणार असल्याचे संकेत ग्रा.पं. प्रशासनाने दिले आहेत.
नीता आणि अरविंद बक्षीजी वैद्य या दाम्पत्याने ११ मार्च रोजी दत्तूजी सोमाजी माकडे यांचे ६० फुट लांब, २५ फुट रूंद असे १५०० चौरस फुट जागेतील घर खरेदी केले. त्यावेळी चार खोल्या, विहीर आणि संरक्षण भिंत होती; पण केवळ ७७७ चौरस फुट जागेतच बांधकाम होते. याबाबतचे दस्ताऐवज बोरगाव ग्रा.पं. मध्ये आहे. व्यवसायाने शिक्षक असलेल्या अरविंद वैद्य यांनी तीन महिन्यांपूर्वी कोणतीही परवानगी न घेता घर पाडले. यानंतर बांधकामाचीही परवानगी घेतली नाही. स्वमर्जीनेच घराचे बांधकाम सुरू केले. भूखंड असलेल्या जागेत बांधकाम होत नसल्याचे दिसते. यामुळे ग्रा.पं. च्या मासिक सभेत ठराव घेवून त्यांना नोटीस बजावण्यात आला. यात काम थांबविण्याच्या सूचना केल्या. शिवाय भूखंडाबाबतचे दस्तावेज सादर करण्यास सांगण्यात आले.
यावरून वैद्य यांनी माहिती सादर केली. यात घराला भेगा पडल्याने घराची केवळ डागडुजी करीत असल्याचा उल्लेख केला. प्रत्यक्षात त्यांनी संपूर्ण घरच जमीनदोस्त करून पुन्हा बांधकाम करीत असल्याचे दिसून आले. शिवाय ही माहिती मुख्यमंत्री, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पालकमंत्री, मानवाधिकार कल्याण समितीकडे पाठविल्याचे दर्शविले. प्रत्यक्षात त्यांनी ही माहिती कुणालाही दिली नाही. यावरून यातील सत्य पूढे येते. वर्धा लगतच्या अकरा गावांत अशी अवैध बांधकामे होत आहे. बोरगाव येथील बांधकामांवर आता ग्रा.पं. च कार्यवाही करणार असल्याची माहिती उपसरपंच मोहन येळणे यांनी दिली.(कार्यालय प्रतिनिधी)
प्रशासनाचा बुडतोय महसूल
घर, दुकान, फ्लॅट आदी कशाचेही बांधकाम करावयाचे झाल्यास संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेकडून परवानगी घेणे गरजेचे असते; पण गत काही वर्षांपासून शहरालगतच्या अकरा ग्रामपंचायतींच्या हद्दीत परवानगी न घेताच बांधकाम करण्याचा सपाटा सुरू आहे. परिणामी, प्रशासनाचा मोठा महसूल बुडत आहे. हा मुद्दा वरिष्ठ स्तरापर्यंत चर्चिला जात असताना बोरगाव येथे ग्रामपंचायतीच्या नोटीस व ठरावालाही नागरिक जुमानत नसल्याचे समोर आले आहे. परिणामी सर्वच अवैध बांधकामांवर गंडातर येणार आहे.
बोरगाव (मेघे) ग्रामपंचायत प्रशासनाने तत्सम पावले उचलली आहे. मासिक सभेमध्ये ठराव घेण्यात आला असून संबंधितांना नोटीस बजावण्याच्या कार्यवाहीला प्रारंभ झाला आहे. यामुळे अवैध बांधकाम करणाऱ्या नागरिकांमध्ये धडकी भरल्याचे दिसून येत आहे.