वायगावच्या हळदीमुळे जागतिक बाजारपेठ झाली पिवळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 11:38 AM2018-06-14T11:38:34+5:302018-06-14T11:38:44+5:30
भौगोलिक उपदर्शन जिओग्राफिकल इंडिगेशन चेन्नईच्या सर्वेक्षणात वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील वायगाव (हळद्या) येथे पिकणाऱ्या हळदीमध्ये दर्जेदार कर्क्यूमिन हा औषधी घटक ६ टक्के अधिक असल्याचे प्रमाणीत झाले आहे.
सुधीर खडसे।
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : हळद हा भारतीय संस्कृतीतील एक मानबिंदू मानला जातो. या औषधीयुक्त बहुगुणी हळदीचे उत्पादन वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील वायगाव (हळद्या) येथे होते. भौगोलिक उपदर्शन जिओग्राफिकल इंडिगेशन चेन्नईच्या सर्वेक्षणात वायगाव (हळद्या) शिवारातील जमिनीत पिकणाऱ्या हळदीमध्ये दर्जेदार कर्क्यूमिन हा औषधी घटक ६ टक्के अधिक असल्याचे प्रमाणीत झाले आहे. अनेक पिढ्यांपासून येथील शेतकरी हळदीची लागवड करीत भरघोस पीक घेतात. किंबहुना भारतच नव्हे तर जागतिक बाजारपेठेत येथील हळदीची ख्याती आहे.
५ वर्षांपूर्वी सेलम जातीच्या हळदीला पर्याय म्हणून वायगाव हळदीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या उद्यान विद्या शाखेच्या शास्त्रज्ञांनी संशोधन केले. यात इतर जातीच्या तुलनेत वायगाव (हळद्या) येथील हळदीमध्ये कर्क्यूमिनचे प्रमाण अधिक असल्याचे सिद्ध झाले होते. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी वाढू लागली. या जातीची हळद समजत नसली तरी ग्राहक वायगावचीच हळद द्या, असे दुकानदाराला आवर्जून सांगतात. वायगाव हे ‘ब्रँड’ लोकप्रिय झालेले आहे. या हळदीच्या जातीच्या बियाण्याला खर्च वजा जाता शेतकऱ्यांना ७० ते ७५ हजार रुपये प्रती हेक्टर नफा मिळत असल्याचेही सांगण्यात आले आहे.
हळद पिकावर बँक पीक कर्ज देत नाही. जमीन पाहून कर्ज दिले जाते.
- आशिष श्यामराव पाटील, शेतकरी, वायगाव (हळद्या).
दिवसेंदिवस मजूर मिळत नसल्याने हळदीची शेती करणे कठीण झाले आहे. या शेतीसाठी यांत्रिकीकरणाचा शोध लावणे गरजेचे झाले आहे.
- गणपतराव घुमडे, शेतकरी, वायगाव (हळद्या).
हळदीचे उत्पन्न एकरी १ लाख २५ हजार ते दीड लाखांपर्यंत होत असून घरचे बियाणे (बेणे) असल्याने पाणी देणे मशागतीकरिता ३० ते ४० हजारांचा खर्च येतो. यामुळे माझ्या अनेक पिढ्यांपासून हळदीची शेती करतो.
- लक्ष्मणराव दळणे, शेतकरी, वायगाव (हळद्या).
हळद उत्पादक उपाशी, व्यापारी तुपाशी
एवढी मोठी कोट्यवधीची उलाढाल करणाऱ्या हळदीची समुद्रपूर मार्केट कमिटीमध्ये बाजारपेठ नाही. यामुळे हळदीचे उत्पादन निघाल्यानंतर खरेदी करण्याकरिता व्यापारी, दलाल मोठ्या शहरांतून येऊन हळद उत्पादकाच्या घरी जात पडेल भावात खरेदी करतात व ती शहरात चढ्या भावाने विकतात. त्यापेक्षा समुद्रपूर मार्केट कमिटीने मार्केट यार्डवर हळद उत्पादकाचा माल जमा करून मोठ्या शहरांतील हळद खरेदीदारांना बोलवून लिलाव पद्धतीने विक्री केल्यास हळद उत्पादकांना चांगला भाव मिळू शकतो. हक्काची बाजारपेठही निर्माण होईल. हळद उत्पादनासाठी कठोर परिश्रम, मुबलक पैसा लागतो. मोठ्या प्रमाणात मजूर वर्ग लागतो. काळानुसार मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे दिवसेंदिवस हळद उत्पादन क्षेत्र कमी होत असल्याचे दिसत आहे. सध्या ३२५ हेक्टरमध्ये हळदीचे पीक या परिसरात घेतले जात आहे.