‘देवी’ अवतरताच वर्धेकर आले धावून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 11:47 PM2018-11-23T23:47:13+5:302018-11-23T23:48:15+5:30
ए... ओऽऽओ ए...भूर भूर भूर भूर हे गाणं ऐकताच आपल्याला नव्यानेच प्रदर्शित झालेल्या ‘नाळ’ या मराठी चित्रपटाची आठवण येते. या चित्रपटातील चिमुकल्या कलाकारांनी सर्वांनाच भुरळ घातली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : ए... ओऽऽओ ए...भूर भूर भूर भूर हे गाणं ऐकताच आपल्याला नव्यानेच प्रदर्शित झालेल्या ‘नाळ’ या मराठी चित्रपटाची आठवण येते. या चित्रपटातील चिमुकल्या कलाकारांनी सर्वांनाच भुरळ घातली आहे. या चित्रपटातील ‘देवी’ एका कार्यक्रमाकरिता वर्ध्यात आली होती. ती आल्याचे कळताच वर्धेकरांनी तिला भेटण्यासाठी गर्दी केली होती. तिचे स्वागत यावेळी वर्धेतील गणमान्य व्यक्तींच्या हस्ते करण्यात आले.
‘नाळ’ या मराठी चित्रपटात ‘देवी’ ची भूमिका साकारणारी अमरावती येथील ९ वर्षाची चिमुकली मैथिली श्याम ठाकरे ही वर्ध्यातील श्रीराम गव्हाणे यांच्याकडील कार्यक्रमाला आली होती. इतक्या लहान वयात चित्रपटात काम करुन सर्वांच्या मनात घर करणारी बाल अभिनेत्री वर्ध्यात आल्याचे कळताच शहरातील वर्धा कला महोत्सव समिती, संग्राम युथ फाऊंडेशन, तुळजाई सामाजिक संघटना, व्यापारी संघटना यांच्यासह विविध सांस्कृतिक, सामाजिक व व्यापारी संघटनांनी भेट घेऊन स्वागत केले.
दोन दिवस वडीलांसह मुक्कामी असलेल्या मैथिलीने वर्ध्यातील चिमुकल्या मित्रमैत्रिंनीसोबतचही संवाद साधला. तिचा हा पहिलाच चित्रपट असून इतक्या कमी वयात रसिकांच्या मनात घर केल्याने साऱ्यांन्याच तिचा लळा लागला. तिला प्रत्यक्ष बघण्याची इच्छा वर्धेकरांनी या दोन दिवसात पूर्ण केली.
महिनाभर घरापासून होती लांब
मैथिली ठाकरे ही तिसऱ्या वर्गात शिक्षण घेत असून नाळ या चित्रपटाकरिता दोन वर्षापूर्वी झालेल्या आॅडिशनमध्ये पात्र ठरली होती. अंगी असलेल्या कलागुणांच्या आधारे तिने मराठी चित्रपटात स्थान मिळविले. या चित्रपटाची शुटींग दोन वर्षापासून सुरु करण्यात आल्याने याकरिता ती वडिलांसोबत महिनाभर घरापासून लांब होती. हा पहिलाच चित्रपट असून खूप काही शिकायला मिळाले, यातून प्रेरणा घेऊ न प्रेक्षकांच्या आशीर्वादाने पुढील वाटचाल करणार असल्याचे तिने यावेळी बोलून दाखविले.