सोने ८१ हजारांवर, चांदी एक लाखावर; आठवडाभरात चांदीच्या दरात साडेपाच हजारांनी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 05:21 PM2024-10-29T17:21:01+5:302024-10-29T17:25:01+5:30
Vardha : ग्राहकांत खरेदीसाठी उत्साह कायम
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : अलीकडे केंद्र शासनाने सोने- चांदीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. इतर देशांनीही सोन्यात गुंतवणूक केल्याने तसेच इराण इस्राइल युद्धाचा भडका उडाल्याने सोन्याचे भाव तेजीत असल्याचे सांगण्यात आले आहे.
सराफा बाजारात सोन्याचे दर जीएसटीसह ८ हजार ६१ रुपयांवर पोहोचले आहे. तर चांदी प्रतिकिलो एक लाख रुपयांवर गेली आहे. वर्षअखेर सोने ९० हजारांच्या घरात सोने जाण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दिवाळी सणाला सोने खरेदीचा मुहूर्त साधला जातो. २७ तारखेला २४ कॅरेट सोने प्रतितोळा ७८ हजार ८०० रुपये, तर चांदी प्रतितोळा ९७० रुपये एवढा भाव होता. सोमवारी दर घसरून सोने प्रतितोळा ७८ हजार २००, तर चांदी ९६० रुपये दर असल्याचे सांगण्यात आले.
युद्ध आणि दरवाढीचा संबंध काय?
- युद्ध आणि भू-राजकीय अशांततेच्या काळात गुंतव- णूकदार सोन्याकडे मूल्याचे एक विश्वासार्ह भांडार म्हणून पाहतात. जे त्यांची संपत्ती टिकवून ठेवू शकतात आणि अधिक मंदीपासून बचाव करू शकतात. यामुळेच जोखमीच्या काळात सोन्याच्या दरात वाढ होते. त्यामुळे त्यांची किंमत वाढते.
- सौर प्लेटसह औषधांसाठी चांदीचा वापर केला जात आहे. वापरात आलेली चांदी पुन्हा परत येणार नाही. यातून चांदीच्या दरातही मोठी वाढ नोंदविली जात आहे. याचा परिणाम चांदीच्या दरात वाढ होण्यावर झाला असल्याचे सांगण्यात आले आहे
युद्धामुळे अस्थिरता वाढली
स्थावर मालमत्तेवरील गुंतवणु- कीपेक्षा सोन्यातील गुंतवणूक प्रत्येक गुंतवणूकदारांकडून वाढली आहे. याचा परिणाम सोन्याच्या दरावर झाला आहे, चांदीच्या दरातही कमालीची वाढ नोंदविली आहे. सोमवारी सोन्याचे दर ५०० रुपयांनी कमी झाल. असे असले तरी मागील दहा दिवसांत सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
चांदीचे दर पाच वर्षांत तिप्पट
२०१९ पूर्वी चांदीचे दर ४० हजार रुपये किलोच्या घरात होते. मागील पाच वर्षांत चांदीचे दर तिपटीने वाढले आहे. आता एक लाख रुपये किलोच्या घरात चांदी पोहोचली आहे. आजपर्यंत इतिहासातील चांदीच्या दरातील ही सर्वात मोठी वाढ मानली जात आहे. सोन्याच्या दराप्रमाणे चांदीचा वापर वाढला आहे.
"गेल्या काही वर्षांत सातत्याने सोन्याचे दर वाढते आहे. जागतिक युद्धाचा सोन्याच्या दरावर परिणाम होते. दिवाळीच्या मुहूर्ताला सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होते आहे. भविष्यात गुंतवणूक म्हणून नागरिक सोन्याकडे पाहत आहे."
- सौरभ ढोमणे, सराफा व्यावसायिक, वर्धा
"यंदा सोने वर्षअखेर ८० हजारांचा टप्पा पार करेल, असा अंदाज होता. मात्र, दिवाळीपूर्वीच सोन्याने हा टप्पा गाठला आहे. वर्षअखेर सोने ८५ हजार पार करण्याचा अंदाज आहे. यंदा धनत्रयोदशीला साधारण १५ टक्क्यांनी जादा सोने खरेदी होण्याची शक्यता आहे."
- विपुल करंडे, सराफा व्यावसायिक, वर्धा