दर कमी होऊनही निविदेमध्ये गोलमाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 12:15 AM2018-02-11T00:15:14+5:302018-02-11T00:15:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : नगरपंचायतने एलईडी लाईटसाठी काढलेली निविदा सन २०१७-१८ च्या नवीन सीएसआर यादीने प्रकाशित होवून सुद्धा सदर निविदा दर जास्त असलेल्या जुन्या सीएसआरने काढल्यामुळे निविदा रद्द होवून नवीन सुधारित दराने निविदा काढण्याची मागणी भाजपा नगरसेवक अॅड. मनीष ठोंबरे, नगरसेवक सुरेश काळबांडे यांनी केली आहे. या बाबतचे निवेदन मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
एलईडी लाईटच्या निविदामध्ये सभागृहातील चर्चेच्या आधीच बऱ्याच भानगडी करुन ठेवल्या आहे. नामांकित कंपन्याचे दर व अटी सुलभ असताना सत्ताधारी भलत्याच अटींवर अडून बसले आहेत. नवीन अंदाजपत्रकाचे दर लागू झाल्यावर ई-निविदा निघाली, असे असताना जुन्या दराने मंजुरी देण्याची गरज नव्हती. त्यामुळे तब्बल ३ लाखाचा फायदा एजंसीला मिळून देत शासनाच्या तिजोरिलाच चुना लावला असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. आर्वी येथील कदम नावाच्या कंत्राटदारालाच सदर निविदा मिळावी म्हणून नगरपंचायतीने अटी घातल्या होत्या. सदर अटींची पुर्तता त्यांनी केली नाही. तरीही निविदा त्यांनाच का? याचे उत्तर नगरपंचायत प्रशासनाने सभागृहात देण्याची मागणी नगर सेवक अॅड. मनीष ठोंबरे यांनी केली आहे. एवढे सगळे करुनही लाईटचे देयक काढल्यास जनहित याचिका दाखल करण्यात येईल. या प्रकरणी तात्काळ चौकशी करुन दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
३५० एलईडी लाईट लावण्यातही गोलमाल
शहरात सार्वजनिक रस्ते, चौक, मंदीर, शासकीय कार्यालयसह सार्वजनिक ठिकाणी जास्त प्रकाश पडावा म्हणून लाईट लावायचे सोडून सत्ताधारी कुठेही मनमानी करुन लाईट लावत आहेत. जेथे लाईट नाही तेथे लाईट लावण्याचे सोडून एकाच ठिकाणी जुना व नवीन लाईट लावण्याचा प्रकार केल्या जात आहे, असा आरोपही निवेदनातून केला आहे.