उत्तम आहार, आरोग्यदायी कुटुंबासाठी ‘माझी पोषण परसबाग’ मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 12:33 PM2020-06-30T12:33:02+5:302020-06-30T12:34:08+5:30
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्यावतीने कृतीसंगम प्रकल्पांतर्गत ‘माझी पोषण परसबाग’ मोहीम सुरु करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महिलेच्या गर्भधारणा ते बाळाच्या २ वर्षादरम्यान एकूण १ हजार दिवसाच्या कालावधीमध्ये पोषणाची आणि आरोग्याची स्थिती सुधारण्यासाठी त्यांच्या आहारामध्ये विषमुक्त, ताजा आणि पोषक तत्त्वांनी युक्त भाजीपाला नियमित येणे आवश्यक आहे. त्यामुळे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्यावतीने कृतीसंगम प्रकल्पांतर्गत ‘माझी पोषण परसबाग’ मोहीम सुरु करण्यात आली आहे.
उमेद अभियानाअंतर्गत स्थापित स्वयं सहाय्यता समुहांमधील सदस्यांच्या पोषणाची आणि आरोग्याची स्थिती सुदृढ राहावी, यासाठी समुहांच्या कुटुंब स्तरावर वैयक्तिक पोषण परसबागेच्या विकसनाचे महत्त्वाकांक्षी कार्य उमेद अभियानाअंतर्गत सुरु आहे. २०२०-२१ मध्ये सुद्धा समूह स्तरावर वैयक्तिक आणि सामूहिक पोषण परसबागेच्या विकसनाचे कार्य सुरु असून याकरिता २५ जून ते १५ जुलै या कालावधीमध्ये ‘माझी पोषण परसबाग’ मोहीम राबविली जात आहे. यावर्षी जिल्ह्यातील आठही तालुक्यामध्ये ८ हजार पेक्षा अधिक वैयक्तिक व सामुदायिक आरोग्यदायी पोषण परसबाग बनविण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सत्यजीत बडे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा अभियान व्यवस्थापक स्वाती वानखेडे व अमोल पाटील यांची यंत्रणा कार्यरत आहे.
अभियानांतर्गत यासाठी होतेय कार्य
गरोदर स्त्रिया, स्तनदा माता आणि त्यांच्या बालकांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला जातो.जीवन चक्राच्या योग्य वेळी, योग्य व्यक्तीने योग्य कृती अंमलात आणावी. तसेच गरोदरपणातील आणि स्तनदा अवस्थेतील स्त्रीचे पोषण, मुलभूत स्तनपान आणि पूरक पोषक आहाराच्या पद्धती, आजारी आणि कुपोषित बालकाच्या पोषणाची काळजी, अॅनिमिया (रक्तक्षय), जीवनसत्व-अ आणि आयोडीनच्या कमतरतेवर नियंत्रण आदी मुद्यांवर लक्ष पुरविले जात आहे. वैयक्तिक स्वच्छता, हात धुण्याची पद्धती व सवय आणि शौचालय, स्वयंपाक घराशेजारी स्वच्छ पाण्याच्या स्त्रोताची उपलब्धता तसेच उच्च दर्जाचे जैविक पद्धतीने पिकवलेल्या पोषणयुक्त भाज्या गरोदर महिला व स्तनदा माता आणि ६ ते २४ महिन्यातील बालकाच्या आहारामध्ये आणणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.