नगर रचनाकार कार्यालयात गोरखधंदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 10:39 PM2018-04-05T22:39:29+5:302018-04-05T22:39:29+5:30
येथील नगर रचनाकार कार्यालयातील सहायक नगर रचनाकारास २० हजारांची लाच स्वीकारल्या प्रकरणी अटक झाली. या कार्यालयातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर लाचखोरी करून नागरिकांचे काम प्रलंबित ठेवल्याच्या तक्रारी पुढे येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : येथील नगर रचनाकार कार्यालयातील सहायक नगर रचनाकारास २० हजारांची लाच स्वीकारल्या प्रकरणी अटक झाली. या कार्यालयातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर लाचखोरी करून नागरिकांचे काम प्रलंबित ठेवल्याच्या तक्रारी पुढे येत आहे. या संदर्भात शेतकरी स्वातंत्र कृती समिती वर्धाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार सादर करण्यात आली आहे. यात कार्यालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कशा पद्धतीने लाचखोरी केली याची जंत्रीच मांडण्यात आली आहे.
नागपूर येथील सुशिक्षित बेरोजगार विजय मोटवानी यांनी कारंजा (घा.) तालुक्यातील राजनगाव येथे नाहरकत प्रमाणपत्रासाठी नगर रचनाकार सतीश देशमुख यांना दीड लाख, सहायक नगर रचनाकार लांडोरे याला ७० हजार तर या कार्यालयातील लिपिक योगेश शेंडे याला २५ हजार रुपयांची लाच दिल्याचे जिल्हाधिकाºयांकडे देण्यात आलेल्या तक्रारीत कृती समितीने नमूद केले आहे. मांडवा येथील शेतीच्या कामासाठी किशोर किनकर यांच्याकडेही नगर रचनाकाराने सात लाखाची मागणी केली होती. पैसे दिले नाही तर तुमचे काम होणार नाही, असे कारकून योगेश शेंडे याने सांगितल्याचे या तक्रारीत नमूद आहे. लांडोरेला सुशिक्षीत बेरोजगाराकडून रोहणा गावातील पेट्रोलपंपाच्या एनओसीसाठी पैसे घेतानाच अटक करण्यात आली. या कार्यालयात लाचखोरीची घटना उघड झाली असून लेखी तक्रारी देण्यास नागरिक व संघटना सरसावल्या आहे. आता याप्रकरणी सतीश देशमुख व योगेश शेंडे या दोघांना ही निलंबीत करण्याची मागणी शेतकरी स्वातंत्र कृती समितीने निवेदनातून केली आहे.