बनावट एनए तयार करणाऱ्या गोरखनाथला अटक
By admin | Published: December 23, 2016 01:49 AM2016-12-23T01:49:55+5:302016-12-23T01:49:55+5:30
येथील भूमाफिया सतीश नरहरशेट्टीवार याच्या प्रकरणात दररोज एक नवा आरोपी समोर येत आहे.
नरहरशेट्टीवार प्रकरणात आरोपींची संख्या चारवर
वर्धा : येथील भूमाफिया सतीश नरहरशेट्टीवार याच्या प्रकरणात दररोज एक नवा आरोपी समोर येत आहे. नरहरशेट्टीवार याने विकलेल्या ले-आऊटचे एनए बनावट असल्याचे समोर येताच पोलिसांनी गुरुवारी ते एनए तयार करणाऱ्यालाही ताब्यात घेतले. त्याचे नाव गोरखनाथ चौधरी असे असल्याचे सांगण्यात आले आहे. एनए तयार करण्याच्या व्यवहारावरून त्याच्या नावे ले-आऊट विक्री केल्याचेही तपासात समोर येत आहे.
या प्रकरणात आपले नाव येणार असल्याचा अनेकांना अंदाज आल्याने त्यांनी अटकपूर्व जामीन मिळविण्याकरिता न्यायालयात धाव घेतल्याचे समोर आले आहे. यात एक तलाठी न्यायालयात गेला असून त्याच्या याचिकेवर सुनावणी होणे बाकी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या तलाठ्यावर सावंगी पोलिसांचे विशेष लक्ष असून तो हाती येताच काही ना काही नवे प्रकरण समोर येणार असल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे पोलिसांचे लक्ष या तलाठ्यावर असल्याची चर्चा पोलीस विभागात आहे.
पोलिसांनी बुधवारी अटकेतील सेवानिवृत्त तलाठी नरेश उघडे याच्या घराची झडती घेतली. यात अनेक संशयास्पद कागदपत्रे हाती आली. यातूनच बनावट एनए तयार करणाऱ्याचा सुगावा लागला. यावरून चौधरीला अटक करण्यात आली आहे. त्याला अटक केल्यानंतर गुरुवारी रात्री त्याच्या घराचीही झडती पोलिसांकडून घेण्यात आली. झडतीची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याने पोलिसांना चौधरी याच्या घरात काय सापडले याची माहिती मिळू शकली नाही.
या प्रकरणात सतीश नरहरशेट्टीवार याच्या पत्नीचा सुगावा पोलिसांना लागल्याची चर्चा आहे. या प्रकरणात आणखी किती आरोपी होतात, याकडे वर्धेकरांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
मुंबईतून उचलले ४९ लाखांचे कर्ज
४एकाच भुखंडावरून चार बँकांना गंडा घालणाऱ्या नरहरशेट्टीवार याने मुंबईतून उचललेल्या कर्जाची माहिती घेण्याकरिता गेलेली पोलिसांची चमू परत आली आहे. या चमूने तिथे केलेल्या तपासानुसार एकूण ४९ लाख रुपयांचे कर्ज उचलल्याचे समोर आले आहे.