मिळाला एकदाचा मोबाईल! हरविलेले २९ लाखांचे मोबाईल पोलिसांनी केले परत
By चैतन्य जोशी | Published: September 23, 2023 10:30 PM2023-09-23T22:30:13+5:302023-09-23T22:30:30+5:30
गणेशोत्सवात बाप्पा पावला, पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या हस्ते वितरण
चैतन्य जोशी, वर्धा: एकदा मोबाईल हरवला की तो पुन्हा परत मिळण्याची आशाच सोडून दिली जाते. एवढ्या प्रचंड लोकसंख्येत पोलिस तरी कसा शोध लावणार या निष्कर्षावर नागरिक येतात. पण, तंत्रज्ञान एवढे विकसित झाले की कुठलीही गोष्ट अशक्य नाही. ज्यांचे महागडे फोन हरविले किंवा चोरीला गेले आहेत, असे २८८मोबाईल सायबर पोलिसांनी शोधून आणले असून पोलिस अधीक्षक नुरुल हसन, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्यायाधीश विवेक देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांच्या हस्ते मुळमालकांना परत दिले. नागरिकांनीही गणेशोत्सवात आम्हाला ‘बाप्पा’ पावला अशा प्रतिक्रिया देत पोलिसांचे आभार मानले. मोबाईल चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून सायबर पोलिसांकडून तपास करुन २८८ मोबाईल शोधले. सर्व मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना वितरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी पोलिस मुख्यालयातील आर्शिवाद सभागृहात करण्यात आले.
जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन हद्दीत गहाळ झालेल्या मोबाईलच्या तक्रारीचे प्रमाण वाढले असुन महागडे अँन्ड्राईड मोबाईल गहाळ झाल्याने नागरीकांचा हिरमोड झाला होतो, अशांना त्यांचे मोबाईल परत मिळवुन कसे देता येतील याची योजना पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी आखली होती त्यानुसार सायबर सेल, सायबर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी शोधमोहीमेत चालु वर्षात जिल्ह्यात हरविलेल्या मोबाईलपैकी २९ लाख ४७ हजार ७०० रुपयांचे २८८ मोबाईल हस्तगत करुन कार्यक्रमाला उपस्थित १५६ नागरिकांसह मूळ मालकांना परत करण्यात आले.
ही कामगिरी पोलीस उप अधीक्षक (गृह) मनोज वाडीवे यांच्या मार्गदर्शनात सायबर ठाण्याचे पोलिस निरीक्षक कांचन पांडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कापडे, दिनेश बोथकर, निलेश कट्टोजवार, मिना कौरती, कुलदीप टांकसाळे, विशाल मडावी, अनुप कावळे, अक्षय राऊत, गोविंद मुंडे, अंकित जिभे, स्मिता महाजन,वैभव कट्टोजवार, निलेश तेलरांधे, रंजीत जाधव, अनुप राऊत, अमित शुक्ला, प्रतिक वांदिले, लेखा राठोड यांनी केली.
गणेशोत्सवात नागरिकांना ही आमची भेट : एसपी हसन
मोबाईल चोरी किंवा हरविलेल्यांच्या तक्रारी सायबर सेल तसेच सायबर पोलिस ठाण्यात प्राप्त होतात. अनेकांना आपला मोबाईल मिळेल याची शाश्वती नसते. पण, आम्ही आमच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मोबाईल शोधण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार सायबर टीमने मोबाईल शोधले. गणेशोत्सवात नागरिकांना आमच्याकडून ही भेट आहे. सामान्य नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास वाढले. आम्ही नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे, असे प्रतिपादन पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी कार्यक्रमात केले.