लसीकरण झाले असेल तरच घराबाहेर पडा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2021 05:43 PM2021-12-03T17:43:23+5:302021-12-03T17:51:57+5:30
आतापर्यंत जिल्ह्यातील ८ लाख ४६ हजार ४५६ व्यक्तींनी लसीचा पहिला तर ४ लाख ४९ हजार २९ लाभार्थ्यांनी व्हॅक्सिनचे दोन्ही डोस घेतले आहेत.
वर्धा : कोविडचा नवीन उत्परिवर्तीत प्रकार ओमायक्रॉन याला ब्रेक लावण्यासाठी जिल्हा प्रशासन हाय अलर्टवर आहे. वर्धा जिल्ह्यात या नवीन कोविड विषाणूची एन्ट्री होण्यापूर्वीच वर्धा जिल्हा अंशत: १०० टक्के व्हॅक्सिनेट कसा करता येईल यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात आरोग्य विभाग भर देत आहे. विशेष म्हणजे भविष्यातील कोविड संकट लक्षात घेता विविध ठिकाणी कोविड लस क्रमप्राप्त करण्यात आली आहे.
काेविडची लस घेतलेल्यांनाच रेल्वेचा प्रवास तसेच मॉलमध्ये खरेदी करता येत असल्याने लसीकरण झाले असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. लाभार्थ्यांना देण्यात येणारी लस कोविड मृत्यू रोखण्यासाठी उपयुक्त असून, जिल्ह्यातील ९ लाख ६५ हजार व्यक्तींना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातील ८ लाख ४६ हजार ४५६ व्यक्तींनी लसीचा पहिला तर ४ लाख ४९ हजार २९ लाभार्थ्यांनी व्हॅक्सिनचे दोन्ही डोस घेतले आहेत. एकूणच वर्धा जिल्ह्यात उद्दिष्टाच्या तुलनेत ७८.७२ टक्के व्यक्तींचे अंशत: तर ४६.५३ टक्के लाभार्थ्यांचे पूर्णपणे लसीकरण झाले आहे. कोविडच्या संसर्गाला ब्रेक लावण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने काही नियमावली जाहीर केली आहे. यात शासकीय, निमशासकीय तसेच खासगी कार्यालयात कर्मचाऱ्यांना मास्क क्रमप्राप्त, विविध धार्मिक तसेच पर्यटनस्थळी मास्क, सोशल डिस्टन्सिंग, कोविड लसीकरण आदींचा समावेश आहे. त्यामुळे लस घेतली नसेल तर विविध ठिकाणी एन्ट्रीच मिळणार नसल्याने तसेच काेविड लस ही कोरोना मृत्यू रोखण्यासाठी उपयुक्त असल्याने नागरिकांनीही नजीकच्या केंद्रावर जाऊन कोविड लस घेणे गरजेचे आहे.
आतापर्यंत झालेले लसीकरण
* १८ वर्षांपुढील लोकसंख्या : ९,६५,०००
* पहिला डोस : ८,४६,४५६
* दुसरा डोस : ४,४९,०२९
रेल्वे स्थानकावर एन्ट्री नाहीच
* कोविड संकट काळातही रेल्वेची प्रवासी वाहतूक सुरू असली तरी रेल्वेचा प्रवास करणाऱ्यांना कोरोनाची प्रतिबंधात्मक लस क्रमप्राप्त करण्यात आली आहे. एकूणच लस घेतली नसलेल्यांना रेल्वे स्थानकावर एन्ट्रीच मिळत नाही.
* वर्धा शहरासह परिसरातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत काही मॉल आहेत. या ठिकाणी विविध साहित्याची खरेदी करण्यासाठी नागरिक गर्दी करतात. पण, तोंडावर मास्क आणि कोविडची लस घेतली असलेल्यांनाच या व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये प्रवेश दिला जात आहे.
बसचा प्रवास करणाऱ्यांचीही होतेय विचारणा
रापम कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासी वाहतुकीला बऱ्यापैकी ब्रेक लागला असला तरी काही कर्मचारी कर्तव्यावर रुजू झाल्याने काही बसेस प्रवासी वाहतुकीसाठी सोडल्या जात आहेत. असे असले तरी बसमध्ये चढलेल्या प्रवाशांना कोविडची लस घेतली काय याबाबतची विचारणा केली जात आहे. त्यामुळे सध्या लसीकरण हे गरजेचेच आहे.
...तर बाजारात साहित्यही मिळणार नाही
लस घेतली नसेल तर बाजारपेठेत जीवनावश्यक साहित्यही मिळणार नाही अशी चर्चा सध्या नागरिकांमध्ये होत असली तरी त्याबाबतची कुठलीही सूचना जिल्हा प्रशासनाकडून निर्गमित करण्यात आलेली नाही. असे असले तरी घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मास्कचा वापर करावा तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करावे, अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात नाममात्रच कोविड टेस्ट
२०११ च्या जनगणनेनुसार १३ लाखांच्या वर लोकसंख्या असलेल्या वर्धा जिल्ह्यात सध्या नाममात्र कोविड टेस्ट केल्या जात आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोविड चाचण्या करण्याची जबाबदारी जिल्हा शल्य चिकित्सकांवर आहे. मात्र जिल्ह्यात कधी पाच तर कधी केवळ ३७७ कोविड टेस्ट करण्यातच धन्यता मानली जात आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
७५ हून अधिक केंद्रांवरून होतेय लसीकरण
जिल्ह्यातील शहरी असो वा ग्रामीण भागातील एकही लाभार्थी कोविड प्रतिबंधात्मक लसीपासून वंचित राहू नये या हेतूने दररोज जिल्ह्यात किमान ७५ हून अधिक केंद्रांवरून लाभार्थ्यांना कोरोनाची लस दिली जात आहे. नागरिकांनीही नजीकच्या केंद्रावर जाऊन लस घ्यावी, असे आवाहन जि.प.च्या आरोग्य विभागाने केले आहे.