आर्वीत बंदिस्त पांढऱ्या सोन्याला मिळाला मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 05:00 AM2020-04-30T05:00:00+5:302020-04-30T05:00:02+5:30
लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर कापसाला ४ हजार ५०० ते ८०० पर्यंत भाव आहे. शेतकऱ्यांचा विचार करून शासन निर्देशाप्रमाणे २० एप्रिलपासून लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांच्या कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारपर्यंत १४ हजार ६६१ क्विंटल कापसाची आवक झाली आहे. आर्वीत १५ जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरी आहेत.
देऊरवाडा/आर्वी : कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांच्या घरात बंदिस्त असलेल्या पांढºया सोन्याची वाट आता मोकळी झाल्याने शेतकऱ्यांना थोडे का होईना आशेचा किरण दिसू लागला आहे. त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.
लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर कापसाला ४ हजार ५०० ते ८०० पर्यंत भाव आहे. शेतकऱ्यांचा विचार करून शासन निर्देशाप्रमाणे २० एप्रिलपासून लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांच्या कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारपर्यंत १४ हजार ६६१ क्विंटल कापसाची आवक झाली आहे. आर्वीत १५ जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरी आहेत. लॉकडाउनमध्ये सर्व निर्देशांचे पालन करून सोशल डिस्टन्सिंग ठेवून दररोज २० गाड्या कापसाची खरेदी करण्याची मुभा देण्यात आली आहे.
आर्वी तालुक्यात भारतीय कॉटन फेडरेशनतर्फे रोहणा केंद्रावर आजपासून खरेदी सुरू झाली आहे. आर्वी विभागातील १८०२ शेतकºयांनी सीसीआयमध्ये कापूस विक्रीसाठी नोंदणी केली आहे. रोहणा येथे कापूस खरेदीची सुरुवात मंगळवारपासून करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे ही कापूस खरेदी आर्वी आणि खरांगणा केंद्रावर त्वरित सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
कोरोना लॉकडाउन काळात शासनाचे निर्देश असल्याने दररोज अडीच हजार ते तीन हजार क्विंटल कापूस म्हणजे क्षमतेपेक्षा अर्धाच कापूस आर्वीत येत आहे. सर्वसाधारण परिस्थितीत सहा हजार क्विंटल कापूस आर्वीत येतो. जून-जुलैपर्यंत खरेदी सुरू असते.
सीसीआयअंतर्गत तीन केंद्रांसाठी १ ८०२ शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी नोंदणी केली आहे. रोहणा केंद्र सुरू झाले आहे. या एकमेव केंद्रावर कापूस संकलित करणे शक्य नाही. त्यामुळे आर्वी, खरांगणा ही दोन केंद्रे सीसीआयने सुरू करायला पाहिजे. जेणेकरून शेतकºयांची अडचण होणार नाही.
विनोद कोटेवार
सचिव, कृ. उ. बाजार समिती, आर्वी
कापूस खरेदीबाबत सरकारने निर्णय घ्यावा - रामदास तडस
वर्धा - जिल्ह्यात सुमारे २६ लाख क्विटंल कापसाचे उत्पादन झाले. कोरोनामुळे कापसाच्या खरेदी बंद होईपर्यंत अदांचे १९.५० लाख क्विटंल कापसाची खरेदी झालेली आहे. सध्या शेतकऱ्याकडे सुमारे ७ लाख क्विंटल कापूस शिल्लक आहे. तापमानात होणारी वाढ व त्यामुळे घरी साठवून ठेवलेल्या मालाला आग लागणाऱ्यांची शक्यता जास्त असणे तसेच साठविलेल्या कापसातून किटकांचा प्रादुर्भाव होऊन त्वचा रोग होऊ शकतो. त्याचप्रमाणे लॉकडाऊनचा कालावधी वाढू लागल्यामुळे व शेतकºयांना आगामी हंगामात खरेदीची कामे, गरजा भागविण्यासाठी साठवून ठेवलेल्या कापसाची विक्री होणे आवश्यक आहे.
यावर्षी कोरोनामुळे कापूस खरेदीला शासकीय यंत्रणेकडून विलंब झाल्यामुळे शेतकरी चिंतित आहे. मात्र, ही परिस्थीती अत्यंत अपवादात्मक तथा आपातकालीन असून सीसीआय जिनिंग-प्रेसिंग मालक तथा राज्य सरकारने समन्वय राखून रुईचा मुद्दा निकाली काढणे अत्यावश्यक आहे. याबाबत जिल्हाधिकारी वर्धा यांनी प्रधान सचिव, महाराष्ट्र राज्य पणन विभाग यांना तोडगा निघण्याकरिता शासनस्तरावर कार्यवाही करण्याबाबत विनंती केली आहे. शासनाने सीसीआयद्वारा संचालित जिल्ह्यातील आठही खरेदी केंद्रे प्रारंभ करण्याकरिता कार्यवाही करावी, अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी केली आहे. या विषयाला अनुसरून केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री, मुख्यमंत्री तसेच सीसीआयचे चेअरमन यांना ईमेलच्या माध्यमातून पत्र पाठवुन हस्तक्षेप करण्याची विनंती खासदार तडस यांनी केली आहे.
कापूस केंद्राला जिल्हा उपनिबंधकाची भेट
आर्वी : तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती, सीसीआय कापूस केंद्र, जिनिंग प्रेसिंग केंद्राला जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे यांनी भेट दिली. रोहणा येथील शासकीय कापूस खरेदी केंद्र तसेच खाजगी जिनींग फॅक्टरी यांना भेट देवून तेथील कापूस व तुर खरेदीचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी त्यांनी जिनिंग प्रेसिंगची क्षमता किती आहे. कापसाची आवक कशी आहे. आवक वाढविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना सुचविल्या त्यांच्या समावेत सहाय्यक उपनिबंधक जयंत तलमले, आर्वी बाजार समितीचे अॅड.दिलीप काळे, सचिव विनोद कोटेवार, लेखापाल चेतन निस्ताने, संजय मिसाळा, घोडखांदे आदी उपस्थित होते.
शासकीय खरेदीअभावी कापसाला अल्प भाव - केचे
देऊरवाडा/आर्वी : आर्वी विधानसभा क्षेत्रातील आर्वी, आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणात कापुस उत्पादक शेतकरी असून लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत आले आहेत. खरीप हंगामासाठी शेतीची मशागत, जमिनीमध्ये शेणखत, पेरणीपूर्व करावयाची कामे रखडलेली आहे. शासनाच्या वतीने आष्टी, तळेगाव येथे फेडरेशनमार्फत कापूस खरेदी सुरू झाली आहे. तसेच रोहणा येथे सीसीआयमार्फत कापूस खरेदी सुरू झाली आहे. परंतु आर्वी, खरांगणा आणि कारंजा येथे शासकीय खरेदी नसल्याने शेतकऱ्यांना कापसाला कमी भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकºयांना नुकसान सहन करावे लागत आहे. शेतकºयांना योग्य भाव मिळण्यासाठी कापूस खरेदी करणे गरजेचे आहे.