जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध

By Admin | Published: May 2, 2017 12:13 AM2017-05-02T00:13:50+5:302017-05-02T00:13:50+5:30

कृषी, सहकार, उद्योग, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान आदि विकासाच्या क्षेत्रात महाराष्ट्राने देशात नेत्रदीपक प्रगती केली आहे.

Governance committed for overall development of the district | जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध

googlenewsNext

महादेव जानकर : महाराष्ट्र दिन समारंभाचे मुख्य ध्वजारोहण
वर्धा : कृषी, सहकार, उद्योग, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान आदि विकासाच्या क्षेत्रात महाराष्ट्राने देशात नेत्रदीपक प्रगती केली आहे. यासोबतच जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व मत्सविकास मंत्री महादेव जानकर यांनी केले.
जिल्हा क्रीडा संकुल येथे सोमवारी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५७ व्या वर्धापन दिनाचा मुख्य ध्वजारोहण समारंभ आयोजित होता. यावेळी ना. महादेव जानकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर जनतेला संबोधित करताना जानकर बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी नयना गुंडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय दैने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी तसेच इतर विभागातील सर्व अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमात पोलीस दल, गृहरक्षक दल आणि बँड पथकाने पथसंचलन केले.


जलयुक्त शिवारमुळे २५ हजार हेक्टरवर सिंचन
वर्धा : जलयुक्त शिवार अभियानाच्या अंमलबजावणीमध्ये मागील वर्षी पावसाच्या खंड पडलेल्या काळात २५ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकासाठी शेतकऱ्यांना सिंचन करता संरक्षित पाणी देण्यात आले. यामुळे वर्धा जिल्हा नागपूर विभागात जलयुक्त शिवार अभियानात आघाडीवर राहिला. यासाठी जिल्हा प्रशासनाचे ना. जानकर यांनी कौतुक केले.
यंदाच्या वर्षी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध कामे करण्यासाठी १४८ गावाची निवड करण्यात आली आहे. येणाऱ्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने ४ लाख १८ हजार ५०० हेक्टरवरील लागवडीसाठी बियाणे, खते आणि किटकनाशके उपलब्ध करुन द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
जिल्ह्याने नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून जिल्ह्याच्या सर्व योजना आॅनलाईन सुरू केलेल्या असून आपल्या योजनांचे अ‍ॅप तयार केले आहे. यामुळे शासकीय योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहचून कामात पारदर्शकता येत आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत १०० टक्के हागणदारीचे उद्दीष्ट पूर्ण केल्याबाबत जानकर यांनी कौतूक केले.
पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यात राबविलेल्या चारा बाग संकल्पनेची दखल घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारच्या चाराबाग स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, ही वर्धा जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे, असेही याप्रसंगी ना. जानकर यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. अजय येते व मीनल गिरडकर यांनी केले. मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमाला स्वातंत्र्य सैनिक गणमान्य नागरिक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.(प्रतिनिधी)

पाच वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना गवताच्या सीडचे वाटप
आष्टी (श.) - महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ना. महादेव जानकार यांनी पशुवैद्यकीय दवाखाना नांदपूर आणि जसापूर रोपवाटिकेची पाहणी केली. यावेळी पाचही वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना गवताच्या सीडचे वाटप केले असून शेतकऱ्यांसाठी प्रामाणिक काम करण्याचे सांगितले.

पशुवैद्यकीय रुग्णालयाची पाहणी
आष्टी(श.): राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व मत्सविकास मंत्री महादेव जानकर यांनी नांदपूर येथील पशुवैद्यकीस्य रुग्णालयाची पाहणी केली.
यावेळी आर्वी गटविकास अधिकारी पवार, आर्वीचे तालुका कृषी अधिकारी प्रशांत गुल्हाने, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, आर्वीचे तहसीलदार पवार, जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश राजू, आर्वी वनपरिक्षेत्र अधिकारी भूयार, आष्टी वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी, कारंजा वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही.व्ही. तळणीकर, तळेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी टाले, खरांगणा वनपरिक्षेत्र अधिकारी तालन यांच्यासह पशु व वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.
नांदपूर येथे आयोजित कार्यक्रमात पाचही वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना गवताच्या बियाण्यांचे वाटप करण्यात आले. जनावरांना होणारे आजार आणि त्यावर करावयाच्या उपाययोजना यावर त्यांनी यावेळी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर वनविभागाच्या कामांची पाहणी करण्याचा मानस व्यक्त केला.
तळेगाव वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत जसापूर रोपवाटिका येथे जिल्हा वार्षिक योजना मधून बांधण्यात आलेल्या ग्रीन शेडनेट हायटेक रोपवाटिकाची पाहणी केली. उन्हाच्या तडाक्यातही एवढ्या दर्जदार पद्धतीने रोपाची निगा राखल्या जात असल्याबद्दल त्यांनी वनाधिकारी डी.एस. टाले यांचा सत्कार केला. गांडुळ खत युनिटचीही पाहणी केली.
शासनाने विकासाचा अजेंडा हाती घेतला असून गाव हा प्रमुख घटक मानून विकास करण्याचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. शासकीय निधीचा योग्य ठिकाणी वापर करून विकास करण्यास अधिकाऱ्यांनी भुमिका निभावावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. सुमारे दोन तास त्यांनी जसापूर रोपवाटिकामध्ये फिरून माहिती जाणून घेतली.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Governance committed for overall development of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.