हमीभावात तूर खरेदी सुरू करण्याबाबत शासन उदासीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 10:36 PM2019-01-03T22:36:39+5:302019-01-03T22:37:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रोहणा : तूर पिकांचा हमीभाव प्रति क्विंटल ५६७५ रूपये आहे. सध्या बाजारात नवीन तुरीचे भाव चार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रोहणा : तूर पिकांचा हमीभाव प्रति क्विंटल ५६७५ रूपये आहे. सध्या बाजारात नवीन तुरीचे भाव चार हजाराच्या आसपास आहे. नवीन तूर बाजारात येणे सुरू झाले असून आठ-पंधरा दिवसात तुरीची आवक वाढणार आहे. खाजगी व्यापाऱ्यांना तूर विकून शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल १५०० ते १६०० रूपयांचा आर्थिक फटका बसत आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या तुरी हमीभावाने खरेदी करण्याची व्यवस्था केलेली नाही. आॅनलाईन नोंदणीची प्रक्रिया सुरू न झाल्याने शासन तूर खरेदी याबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे.
शेतमाल बाजारात आले की त्याचे भाव पडतात व तो व्यापाऱ्यांच्या गोदामात जमा झाला की मग भाव वाढतात. प्रत्येक शेतमालाबाबत हमीभाव जाहीर करायचा पण त्या भावाने माल खरेदी करण्याबाबत दिरंगाई करायची हे शासनाचे धोरण व्यापाऱ्यांच्या पथ्यावर पडत आहे. यावर्षी तूर खरेदीबाबत तोच अनुभव शेतकऱ्यांना येत आहे. शासनाने तुरीचा हमीभाव प्रतिक्विंटल रू. ५६७५ निश्चीत केला आहे. नवीन तुरी बाजारात येणे सुरू झाले आहे. आठ-पंधरा दिवसात बऱ्याच शेतकऱ्यांच्या तुरी घरी आलेल्या असतील. तुर कापणी व मशीनद्वारे त्या काढणे याचा खर्च भागविण्यासाठी आर्थिक अडचणीतील शेतकऱ्यांना त्या त्वरीत विकणे भाग पडत आहे. बाजारात सध्या तुरीला व्यापारी प्रतिक्विंटल ४००० ते ४४०० रूपयापर्यंत भाव देत आहे. शासनाने हमीभावाने तूर खरेदी करण्याच्या प्रक्रियेतील आॅन लाईन नोंदणी हा पहिला टप्पाच अजून सुरू न केल्याने प्रतिक्विंटल १५०० ते १६०० रूपयाचे आर्थिक नुकसान सहन करून गरजू शेतकऱ्यांना त्या व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. तसेच नोंदणी प्रक्रियाच सुरू झाली नाही त्यामुळे यंदा शासन खरेदी केंद्रे सुरू करते की नाही, याबाबत शेतकरी संभ्रमात आहे. शासनाने तुरीची शासकीय खरेदी केंद्रे सुरू करून तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी आहे.