शेतमालाला भाव, तरुणांना रोजगार देण्यात सरकार अपयशी
By रवींद्र चांदेकर | Published: November 8, 2024 06:02 PM2024-11-08T18:02:56+5:302024-11-08T18:05:11+5:30
शरद पवार यांचा घणाघात : महाराष्ट्राचा चेहरा बदलण्यासाठी साथ देण्याचे आवाहन
हिंगणघाट (वर्धा) : कापूस, सोयाबीन, ऊस पिकांना भाव नाही. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारीमुळे आत्महत्या करीत आहेत. आमच्या हातात सत्ता होती, त्यावेळी सर्वच क्षेत्रात महाराष्ट्र नंबर एक होता. परंतु, भाजपच्या हातात सत्ता गेल्यावर राज्याचा पहिला नंबर घसरला, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी येथील गोकुळधाम मैदानावर आयोजित सभेत केला.
महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अतुल वांदिले यांच्या निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, देशात ६० टक्के शेतकरी आहेत. त्यांच्यावर सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आत्महत्या करण्याची वेळ येत आहे. सोयाबीन, कापूस, ऊस या पिकांना उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नाही. दुसरीकडे शेतीचा खर्च वाढत आहे. अशावेळी तरुणाच्या झुंडी नोकरीसाठी देशभरात हिंडत आहेत. देश रसातळाला जात असताना देशात जाती धर्माचे राजकारण सुरू आहे. भाजपने दहा वर्ष सत्ता उपभोगूनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे. शेतमालाचे भाव पडलेले आहेत. देश व राज्याची अर्थव्यवस्था संकटात आहे. तरुणांच्या हाताला काम नाही, त्यांना नोकरी नाही हे चित्र बदलायचे आहे. याकरिता महाविकास आघाडीच्या हातात पुन्हा एकदा सत्ता द्या, असे आवाहन त्यांनी केले.
भाजपची दहा वर्ष सत्ता असताना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत स्वबळावर सत्ता स्थापन करू शकले नाही. त्यांना अन्य पक्षांच्या मदतीने सरकार बनवावे लागले. हा देश शेतकऱ्यांचा आहे. सत्तेचा वापर शेतकऱ्यांसाठी झाला पाहिजे. मात्र, केंद्रातील भाजपला याची जाणीव नाही. मी कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी त्यांचे ७० हजार कोटींचे कर्ज माफ केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य लाभले होते. सध्या केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे पुन्हा शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येऊन ठेपल्याचा घणाघात त्यांनी केला.
सभेला राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, उमेदवार अतुल वांदिले, नीतेश कराळे, माजी उपनगराध्यक्ष मुरलीमनोहर व्यास यांनीही मार्गदर्शन केले. मंचावर माजी आमदार सुरेश देशमुख, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, माजी आमदार डॉ. वसंत बोंडे, उद्धवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजेंद्र खुपसरे, सतीश धोबे, काँग्रेसचे प्रवीण उपासे, पंढरी कापसे, भाईजी मुंजेवार उपस्थित होते. यावेळी सुनील डोंगरे व माजी नगरसेविका शुभांगी डोंगरे, आरपीआयचे अनिल मून यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा घोषित केला. विजय तामगाडगे यांनी सूत्रसंचालन केले.
विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून निर्णय
राज्य शासनाने विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून पैशांच्या योजना राबविण्याचा सपाटा लावला. १० वर्षे त्यांना या योजना राबवता आल्या नाही. ते पुन्हा सत्तेत आल्यास या योजनांचे खरे स्वरूप दिसेल. सर्व सामान्यांची फसगत होईल. महाविकास आघाडी सत्तेत आल्यास आम्ही महालक्ष्मी योजना, कृषी समृद्धी, युवकांना शब्द, कुटुंब संरक्षण आणि समानतेची हमी, या गॅरंटीवर काम करू, असा विश्वास शरद पवार यांनी दिला.