वर्ध्याच्या विकासाला सरकारने गती दिली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 11:19 PM2019-04-01T23:19:12+5:302019-04-01T23:20:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी काँग्रेस विसर्र्जित करण्याचा सल्ला दिला होता. गेल्यावेळी याच मैदानावर पंतप्रधान ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी काँग्रेस विसर्र्जित करण्याचा सल्ला दिला होता. गेल्यावेळी याच मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली. त्यानंतर लोकसभेपासून ग्रामपंचायतीपर्यंत वर्धा जिल्ह्यातील मतदारांनी काँग्रेसमुक्त जिल्ह्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम केले. राज्य सरकारने विकासात विदर्भावर झालेला अन्याय दूर करण्याचा प्रयत्न केला. वर्धा जिल्ह्यात ५० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. जुन्या सरकारने कर्जमाफी दिली. त्यावेळी फक्त ५२ कोटी रूपये दिले होते. आम्ही शेतकऱ्यांना ४९८ कोटी रूपये दिले. विदर्भाच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचे काम सरकारने केले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
स्थानिक स्वावलंबी मैदानावर पार पडलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. याच सभेत रिपाइं आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोदी सरकारच्या काळात इंदूमिलची जागा देण्याचे काम मार्गी लागले. राहुल गांधींनी पंतप्रधान पदाचेस्वप्न पाहू नये, आधी विरोधी पक्षनेता बनावे असा सल्ला दिला. काँग्रेस देशातील लोकांना भाजप संविधान बदलणार आहे, असे सांगून भडकाविण्याचे काम करीत आहे. परंतु, मी संविधान हा धर्म ग्रंथ असल्याने त्याच्या संरक्षणासाठी मोदीजींच्या सोबत उभा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण प्रयत्न करावे, असे जाहीर आवाहनही त्यांनी केले.
पोलिसांची भिरभिरणारी नजर
स्वावलंबी मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा होती. तसेच लगतच्या लोक महाविद्यालयाच्या मैदानावर तीन हेलिपॅड तयार करण्यात आले होते. याच हेलिपॅडवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उतरणार असल्याने परिसरासह लगतच्या इमारतींवर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. यावेळी सभास्थळालगत असलेल्या इमारतीवरून पोलीस कर्मचारी दुर्बीनच्या सहाय्याने सभास्थळावरील गर्दीच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. तसेच आकाशाकडेही नजर फिरवून हेलिकॉप्टरचा शोध घेत होते. सभा सुरु होण्यापूर्वीपासून संपेपर्यंत सतत दुर्बीणीतून नजर खिळलेली होती.
शाळांनाही द्यावी लागली सुटी
सभास्थळ आणि हेलिपॅड परिसरात स्वावलंबी विद्यालय, मधुबन कॉन्व्हेंट, म्यु. कमला नेहरू विद्यालय, जगजीवनराम विद्यालय व तुकडोजी विद्यालय आहेत. सभा १० वाजतापासून सुरू होणार असल्याने सकाळी ८ ते ९ वाजतापासूनच मैदानावर गर्दी व्हायला सुरुवात झाली होती. त्यामुळे सभेच्या सुरुवातीपासून तर सभा संपेपर्यंत या परिसरातील मार्गावर मोठी गर्दी उसळणार असल्याने या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून साडेनऊ वाजताच सुटी देण्यात आली. विशेषत: स्वावलंबी विद्यालय, तुकडोजी विद्यालय व जगजीवनराम विद्यालयातील विद्यार्थ्यांचा सकाळी ७.३० ते ९.३० वाजतापर्यंत पेपर होता.
विद्यार्थ्यांनाही आवरता आला नाही मोह
सभेकरिता आलेल्या कार्यकर्त्यांना नेत्यांचे कटआऊट्स, मुखवट, पक्षाचे झेंडे व दुपट्ट्यांचे वाटप केले जात होते. यात रस्त्याने जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या कटआऊट्स, मुखवटे व दुपट्ट्यांचा मोह आवरता आला नाही. त्यांनीही कटआऊट्स, मुखवटे लावून सायकलवरुन आपली सैर करीत आनंद लुटला. अनेकांनी उन्हापासून बचावाकरिता कटआउट आणि मुखवट्यांचा वापर केला.
हेलिकॉप्टर पाहण्यासाठी गर्दी
तुकडोजी विद्यालयासमोरील मैदानावर तीन हेलिकॉप्टर उतरणार असून त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी राहणार असल्याची माहिती परिसरातील नागरिकांना झाल्यामुळे हेलिकॉप्टरच्या आकाशातील घिरट्या कानावर पडताच नागरिकांनी छतावर गर्दी केली होती. तसेच सभा संपल्यानंतरही सर्व नागरिक हेलिकॉप्टर बघण्यासाठी एकत्र आले होते. तसेच या परिसरातील रस्तेही नागरिकांनी जाम केले होते. यात लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सारेच उपस्थित होते. हेलिकॉप्टरच्या धुळीमुळे अनेक नागरिकांनी डोळे चोळत घराचा रस्ता धरला.