शासकीय वसतिगृहातील संगणक धूळखात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 11:46 PM2017-09-14T23:46:26+5:302017-09-14T23:46:55+5:30
समाज कल्याण विभागाद्वारे शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना तेथेच संगणकाचे प्रशिक्षण मिळावे म्हणून संगणक देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : समाज कल्याण विभागाद्वारे शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना तेथेच संगणकाचे प्रशिक्षण मिळावे म्हणून संगणक देण्यात आले. यासाठी २०११-१२ या सत्रात कॉम्प्यूटरची खरेदी करण्यात आले. देवळी येथील वसतिगृहात संगणक देण्यात आले; पण अद्यापही शिकविण्यासाठी प्रशिक्षकाची नियुक्ती केली नाही. यामुळे वसतिगृहांतील संगणक बंद खोलीत धूळखात पडून आहे.
राज्य शासनाने मागासवर्गीय वसतिगृहात राहणाºया विद्यार्थ्यांना मोफत संगणक प्रशिक्षण मिळावे या चांगल्या उद्देशाने ही योजना अमलात आणली. प्रारंभी या योजनेचे सर्वस्तरातून स्वागत करण्यात आले; पण तीन-चार वर्षांचा कालावधी लोटला असताना या वसतिगृहात राहणाºया विद्यार्थ्यांना कॉम्प्यूटर प्रशिक्षण देणारा शिक्षक महाराष्ट्र शासनाच्यावतीने उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. यामुळे संगणकांचा वापरच होत नसल्याचे दिसून येत आहे. प्रशिक्षक नसल्याने विद्यार्थीच शिकतात आणि विद्यार्थीच शिकवितात, अशी स्थिती निर्माण झाली आहे. मागील चार-पाच वर्षांपासून धूळखात पडलेल्या या संगणकाच्या महत्त्वाच्या मुद्याकडे लोकप्रतिनिधी तथा अधिकाºयांचेही दुर्लक्ष होत आहे.
वसतिगृहातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना संगणकाचे महागडे प्रशिक्षण मोफत मिळावे, हा उद्देश्य सफल होताना दिसून येत नाही. कॉम्प्यूटर प्रशिक्षण घेऊन पुढील जीवनात विद्यार्थ्यांना फायदा व्हावा, ही चांगली कल्पना होती; पण शासकीय उदासिनतेमुळे हा चांगला उद्देश्य दुर्लक्षित राहिला आहे. वास्तविक, दोन -तीन वसतिगृह मिळून एक प्रशिक्षक नेमणे शासनासाठी फार कठीण बाब नव्हती; पण या योजनेकडेच शासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या समस्येकडे लक्ष देत संगणक सुरू करणे तथा योजनेचा लाभ देण्याकरिता उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. शासनाने लक्ष देत प्रत्येक वसतिगृहामध्ये प्रशिक्षकाची नियुक्ती करावी, विद्यार्थ्यांना वसतिगृहातच संगणकाचे प्रशिक्षण देण्याची सोय करावी, अशी मागणी रिपाईचे नरेंद्र ओंकार यांनी निवेदनातून केली आहे.
चांगल्या योजनेला प्रशासकीय उदासिनतेचे ग्रहण
शासकीय वसतिगृहांमध्ये राहून ग्रामीण भागातील गरीब, होतकरू मुले शाळा, महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेतात. त्या विद्यार्थ्यांना महागडे प्रशिक्षण घेणे शक्य होत नाही. यामुळे शासनाच्यावतीने त्यांच्याकरिता विविध उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून वसतिगृहातील विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रशिक्षण मिळावे म्हणून संगणक उपलब्ध करून देण्यात आले; पण प्रशिक्षकाची नियुक्ती केली नाही. शिवाय संगणकही बंद खोलीत पडून आहे. यामुळे चांगल्या योजनेला उदासिनतेचे ग्रहणच लागले आहे.