शासकीय तूर खरेदीत लूट
By admin | Published: June 4, 2017 12:58 AM2017-06-04T00:58:44+5:302017-06-04T00:58:44+5:30
तकऱ्यांकडून तूर खरेदी करण्याकरिता खरेदी-विक्री संघाची सब एजन्ट म्हणून नियुक्ती केली आहे.
खरेदी-विक्री संघाचा प्रताप : संचालकच करताहेत तुरीचे मोजमाप
सुधीर खडसे। लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : शेतकऱ्यांकडून तूर खरेदी करण्याकरिता खरेदी-विक्री संघाची सब एजन्ट म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्यामार्फत शेतकऱ्यांकडून तुरीची खरेदी समुद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डवर सुरू आहे. यात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट केली जात आहे. मोजमाप आणि चाळणीचा खर्च शेतकऱ्यांकडून वसूल केला जात असून पावतीही दिली जात नाही. याकडे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे झाले आहे.
शेतकऱ्यांकडून सध्या पणन महामंडळ तूर खरेदी करीत आहे. यापूर्वी नाफेडकडून तुरीची खरेदी करण्यात आले. तुरीचे पीक मोठ्या प्रमाणात झाल्याने भाव पडले. परिणामी, पणन संचालक वर्धाकडून शासकीय तूर खरेदी सुरू आहे. खरेदी- विक्री संघाकडून तुरीचे मोजमाप झाल्यानंतर चाळणी व मोजण्याचा खर्र्च ६० ते ७५ रुपये प्रती क्विंटल शेतकऱ्यांकडून नगदी स्वरूपात वसूल केला जात आहे. याची पावतीही दिली जात नाही. शेतकरी आपला माल चांगल्या किंमतीत जात असल्याने बिनदिक्कत खरेदी-विक्री संघाच्या कर्मचाऱ्याला ती रक्कम देत असल्याचे दिसून येते. यात प्रामुख्याने समुद्रपूर तालुका भाजपाचे अध्यक्ष व समुद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक संजय डेहणे तसेच खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष आनंद थुटे यांनी प्रती क्विंटल ६० रुपये भावाने मोजमापाचा खर्च दिला आहे. या लुटीतून पदाधिकारीच सुटले नाही तर सामान्य शेतकऱ्यांचे काय, हा प्रश्नच आहे. खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष अॅड. सुधीर कोठारी आहेत. त्यांनी या बाबीची दखल घेणे गरजेचे झाले आहे.
या हंगामात १४ हजार २१४ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांकडून ६५ रुपये भावाने प्रति क्विंटलप्रमाणे आजपर्यंत १ लाख १८ हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत. त्या रकमेचा हिशेब संघाजवळ आहे काय, तो कोणत्या खात्यात जमा आहे, हे प्रश्न अनुत्तरीत आहे.
समुद्रपूर कृउबासचे संचालक वसंत महाजन हे मोजमाप करण्याचे काम सांभाळत आहे. बाजार समितीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सहकारी सोसायटी मतदार संघातून ते निवडून आले आहेत. नियमानुसार संचालकाला मार्केट यार्डमध्ये मोजमाप करण्याचे काम करता येत नाही. असे असताना हा प्रकार सुरू आहे. स्थानिक बाजार समिती प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. ही लूट थांबावी म्हणून अनेक शेतकऱ्यांनी आ. समीर कुणावार यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. यावरून आमदारांनी डीएमओ पणन संचालक यांना माहिती देत चौकशी अहवाल मागितल्याचे सांगण्यात आले आहे.
शेतकरी लुटीतून १.१८ लाख रुपयांची केली वसुली
येथील बाजार समितीमध्ये या हंगामात १४ हजार २१४ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे. प्रत्येक शेतकऱ्यांकडून प्रती क्विंटल ६५ रुपयांच्या हिशेबाने खरेदी-विक्री संघटनेने १ लाख १८ हजार रुपयांची अवैधरित्या वसूल करण्यात आले आहे. या प्रकरण चौकशी करणे गरजेचे झाले आहे.
५० किलोसाठी ३१ रुपये माप करण्याचे हमाली खर्च तर ३ रुपये मोजाईचा खर्च येतो. शिवाय शेतकऱ्यांचा माल उतरवणे, चाळणी करणे असा एकूण ६५ रुपयांचा खर्च असून तो शेतकऱ्यांकडून वसूल केला जातो.
- मोतीराम जीवतोडे, ग्रेडर व ख.वि.संघ व्यवस्थापक.
शेतकऱ्यांच्या तुरीला भाव नसल्यामुळे शासन मदतीचा हात देत आहे. अशा प्रकारे खरेदी-विक्री संघाने शेतकऱ्यांची लूट करणे व अवैध वसुली करणे चुकीचे आहे. याची दखल घेत मी डीएमओला अहवाल मागितला आहे. अहवालानुसार दोषींवर कार्यवाही करण्यात येईल.
- समीर कुणावार, आमदार, हिंगणघाट-समुद्रपूर.