तूर खरेदीकरिता शासकीय यंत्रणा जाणार थेट शेतकऱ्यांपर्यंत
By admin | Published: December 25, 2016 02:20 AM2016-12-25T02:20:41+5:302016-12-25T02:20:41+5:30
शेतकऱ्यांना हमीभावाची खात्री : भारतीय खाद्य निगमकडून होणार खरेदी; अंमलबजावणीकरिता नव्या शेतमालाची प्रतीक्षा
शेतकऱ्यांना हमीभावाची खात्री : भारतीय खाद्य निगमकडून होणार खरेदी; अंमलबजावणीकरिता नव्या शेतमालाची प्रतीक्षा
रूपेश खैरी वर्धा
बाजारात शेतकऱ्यांच्या शेतमालाचे दर व्यापारीच ठरवित असल्याचे आतापर्यंतचे वास्तव होते. यात व्यापाऱ्यांकडून कमी-अधिक दर शेतकऱ्यांना मिळाला आहे. यामुळे कृषी उत्पन्न बाजारात समितीत शासकीय यंत्रणेद्वारे खरेदी व्हावी, अशी मागणी होती. यावर आता शासकीय यंत्रणा म्हणून भारतीय खाद्य निगम थेट शेतकऱ्यांपर्यंत जाऊन तुरीची बोली लावत खरेदी करणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना निदान हमीभावाची तरी खात्री निर्माण झाली आहे.
शासनाच्यावतीने धान्याची खरेदी करण्याकरिता मार्केटींग फेडरेशन ही यंत्रणा आहे; पण त्यांच्याकडून बाजार समितीत क्वचितच खरेदी झाल्याचे दिसते. त्यांच्याकडून शासकीय दरात खरेदी झाली तरी शेतकऱ्यांना चुकाऱ्याकरिता भटकावे लागल्याचे समोर आले आहे. यावर मार्ग म्हणून गावखेड्यात धान्याचा पुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या भारतीय खाद्य निगमच्यावतीने येत्या हंगामात थेट बाजार समितीतून तुरीची खरेदी होणार आहे. यात वर्धा बाजार समितीत खाद्य निगमचे केंद्र देण्यात आले आहे. शासनाच्या सूचनेनुसार या विभागाचे अधिकारी थेट शेतकऱ्यांपर्यंत जात त्यांच्या शेतमालाचे दर ठरविणार आहे.
आतापर्यंत साधारणत: शासकीय केंद्रावर धान्य विक्रीकरिता शेतकऱ्यांना जावे लागत होते. आता मात्र तसे होणार नाही. शासकीय यंत्रणा थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांच्या शेतमालाची बोली लावणार आहे. येत्या हंगामात होणार असलेल्या या प्रकारामुळे शेतकऱ्यांना लाभ होईल, असे बोलले जात आहे. शासकीय यंत्रणा थेट बोली लावणार असल्याने व्यापाऱ्यांनाही शासकीय दरापेक्षा अधिक दर देणे बंधनकारक होणार आहे. यात शेतकऱ्यांची लूट होणार नाही, असा अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता ही अपेक्षा कितपत खरी ठरते, हे नव्या तुरीच्या खरेदीनंतरच कळणार आहे.
डिसेंबर २०१५ मध्ये ९,२०५ तर डिसेंबर २०१६ मध्ये तुरीला ३,८०० रुपये दर
गत हंगामात तुरीचे दर चांगलेच वाढले होेते. शेतकऱ्यांना याचा बराच लाभ झाला. यामुळे येत्या वर्षांत वाढीव दराचा लाभ होईल या आशेने शेतकऱ्यांनी तुरीची लागवड केली; पण या हंगामातील दरावरून त्यांची चांगलीच कोंडी झाली. गतवर्षी डिसेंबर महिन्यात तुरीला क्विंटल मागे सर्वाधिक ९ हजार २०५ तर सर्वात कमी ६ हजार १० रुपये दर मिळाले होते. २०१६ च्या डिसेंबरमध्ये मात्र मिळणारे वाढीव दर गत डिसेंबरमध्ये मिळालेल्या कमी दराच्या तुलनेत अत्यल्प असल्याचे दिसून आले आहे. सध्या तुरीला अधिकाधिक ४,२०० तर कमीतकमी ३ हजार ८०० रुपये दर मिळत आहे. यात शेतकऱ्यांची चांगलीच कोंडी होत आहे.
हिंगणघाट बाजारात नाफेडची खरेदी ?
नवी तूर बाजारात येताच शासकीय यंत्रणा बाजारात उतरणार असल्याचे संंकेत मिळत आहेत. यात वर्धेत भारतीय खाद्य निगम तर जिल्ह्यातच नाही तर विदर्भात नावलौकिक असलेल्या हिंगणघाट बाजार समितीत नाफेडमार्फत विदर्भ को-आॅपरेटीव्ह मार्केटींगकडून खरेदी करण्यात येणार असल्याचे संकेत आहेत. या बाजार समितीत आजही तुरीची आवक सुरू असल्याचे चित्र आहे. याच प्रकारातून प्रत्येक बाजार समितीत शासकीय यंत्रणेमार्फत तुरीची खरेदी करण्यात येणार असल्याचे दिसून आले आहे.