सरकारचे धोरण शेतकऱ्यांच्या विरोधात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 11:21 PM2017-12-25T23:21:30+5:302017-12-25T23:21:40+5:30
सर्वांकडून दुर्लक्षित शेतकऱ्यांनी आपल्या मालाला योग्य भाव मिळण्यासाठी उत्पादनापासून दीडपट निर्धारित मुल्य शासनाने द्यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटने केली होती. मात्र या अशासकीय प्रस्तावावर प्रारंभी बाजूने असलेले नेते निवडणूक येताच बदलले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : सर्वांकडून दुर्लक्षित शेतकऱ्यांनी आपल्या मालाला योग्य भाव मिळण्यासाठी उत्पादनापासून दीडपट निर्धारित मुल्य शासनाने द्यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटने केली होती. मात्र या अशासकीय प्रस्तावावर प्रारंभी बाजूने असलेले नेते निवडणूक येताच बदलले. यामुळे सरकारचे धोरण शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. ते आर्वी येथे आयोजित सभेत बोलेत होते.
संसद भवनात निर्धारित मुल्य शेतकऱ्यांना दीडपट द्यावे या मागणीकरिता ५८ खासदारांनी आपले समर्थन दाखविले होते. परंतु निवडणूक येताच ठेवण्यात आलेल्या या अशासकीय प्रस्तावावर फक्त माझे एकच मत प्रस्तावाच्या बाजुला नोंदण्यात आले. शेतकऱ्यांच्या उज्वल भविष्याकरिता त्यांच्या मालाला योग्य भाव न दिल्यास शेतकऱ्यांनी व शेतमजुरांनी सरकारला त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे. त्याशिवाय सरकार शेतकऱ्यांच्या हितात निर्णय घेणार नाही. आज शेतकरी, शेतमजूर सोडला तर अन्य कोणाचीही अशी अवस्था झाली नाही. जी ही शासनाने शेतकऱ्यांची केलेली आहे.
ग्रामीण क्षेत्रात भाजपाला जबरदस्त धक्का दिल्या गेला आहे. जशी प्रजा तसा राजा भेटत असते. निवडणुकीच्या वेळेला आपण जात-पात, दारू-पैसा व अनेक आश्वासन, प्रलोभन देऊन आपण मतदान करतो. त्याचेच परिणाम निवडून आल्या नंतर हे नेता लोक आपले तोंड उघडायला तयार होत नाहीत. शेतकऱ्यांनी आपली शक्ती निर्माण करावी आणि सरकारच्या विरोधात आंदोलन करावे त्याकरिता स्वाभिमानी संघटना विपरीत स्थितीतही शेतकऱ्यांच्या पाठिशी उभी आहे, असे विचार त्यांनी व्यक्त केले.
वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर म्हणाले, सरकारने रात्री ९.३० वाजता नोटबंदीचा निर्णय घेऊन करोडो रुपयाचे नुकसान केले. पंधरा लाख नोकऱ्या गमावल्या. शेतकऱ्यांनी सर्वात पहिली आत्महत्या १९८६ मध्ये केली. यावर अद्याप मार्ग काढण्यात आला नाही, आत्महत्या सुरूच आहेत. राजकर्त्यांना संवेदना व माणुसकी नाही. त्याच कारणाने स्वाभिमानी शेतकरी संघटना विदर्भात चळवळ उभी करणार आहे. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत शेतकऱ्यांसाठी लढणार असे परखड विचार त्यांनी व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब गावंडे, राजू गोरडे, शेतकरी नेते गजानन बंगाले, डॉ. गौरव वाघ यांनी शेतकऱ्यांच्या हितार्थ अनेक समस्यांसह आपले विचार प्रगट केले.
कार्यक्रमाचे आयोजक प्रा. संजय वानखेडे यांनी प्रास्ताविक केले. संचालन प्रा. कल्याणी वानखेडे यांनी केले. या सभेला आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यासह जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होेते.